Pimpri : असंघटित कामगारांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने अन्नछत्र सुरू 

एमपीसी न्यूज -‌ असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे असणाऱ्या अल्पाइन हॉटेल येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची या अन्नछत्रास अधिकृत परवानगी असून रोज एक हजार कष्टकरी कामगारांना दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. चपाती, भाजी, भात, वरण असलेले पॅकेट यासाठी तयार करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.1) या अन्नछत्र ची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्योजक दिलीप तीलवानी आणि बशीर सय्यद यांच्या हस्ते असंघटित कामगार कष्टकर्‍यांना हे अन्न पॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी  कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, उद्योजक राजू गीडवानी, अनिल शिंदे, कार्यध्यक्ष बळीराम काकडे, सचिव प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोना या भयंकर आजारांमुळे लॉकडाऊन सुरू असून  लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफ सफाई कामगार, कागद, काच, पत्रावेचक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी कष्टकरी लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यामुळे कष्टकरी कामगार पंचायत महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने भुकेलेल्यांना अन्न  एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

रिक्षाचालक, घरेलू कामगार, बांधकाम मजूर, कागद काच पत्रा वेचक, फेरीवाले आदी कष्टकरी असंघटीत कामगार यांना चपाती, भाजी,भात, वरणाचे  पॅकेट घरपोच देण्यात  येणार असून ज्यांना अन्नाचे पॅकेट पाहिजे  असतील त्यांनी, बबन मिसाळ यांना  9766072222 या क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन पंचायत वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.