pimpri : पिंपरीत आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेईना. आज पिंपरी येथे आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आला. हा रुग्ण अमेरिकेतून आला असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचे पिंपरी चिंचवड येथे १० आणि पुणे शहरात ७ असे एकूण १७ रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात मागील 72 तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. तर राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती 14 मार्च रोजी अमेरिका येथून दुबई मार्गे मुंबईला आली. तिथून पुण्यात आली आहे. या व्यक्तीचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल मंगळवारी आला असून त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णासह अन्य बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रशासन त्यांची योग्य ती खबरदारी घेत आहे.

परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचत असून, त्यांना घरातच विलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना ज्यांना प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच ज्यांनी विदेश प्रवास केला आहे, अशा सर्व नागरिकांनी पुढील काही दिवस घरातच राहावे. स्वतःला कुटुंबापासून व समाजापासून अलिप्त ठेवावे. यामध्ये त्या व्यक्तीचे आणि समाजाचे भले आहे. अशा व्यक्ती समाजात फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोका उदभवू देणार नसल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.