Pimpri: आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’;  12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत, केवळ दोन रुग्ण कोरोनाग्रस्त

पाच दिवसात 10 रुग्ण कोरोनामुक्त; 11 दिवसात एकही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली असून रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 12 पैकी 10 रुग्ण ठणठणीत बरे  झाले आहेत.  शहरात आता केवळ 2 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मागील 11 दिवसात एकही नवीन कोरोनाचा पॉझिटिव्ह  रुग्ण आढळला नाही.

हा रुग्ण अमेरिकेतून शहराता आला होता. या रुग्णाला 17 मार्च रोजी महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट सोमवारी (दि.30) निगेटीव्ह आले होते. त्यानंतर दुसरे रिपोर्ट देखील आज निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. हे तीन रुग्ण शुक्रवारी (दि.27)  ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत बरे झाले. तर, शनिवारी (दि.28) आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसात 10 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी गेले आहेत. शहरात आता केवळ दोन कोरोनाग्रस्त रुग्ण  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.