Pimpri: दुस-या संघर्षातही अप्पा बारणे यांची अजितदादांवर मात!

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पवार घराणे आणि श्रीरंग बारणे यांच्यात लोकसभा निवडणुकीत झालेला संघर्ष आणि लढाई ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी देखील पवार आणि बारणे यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्या संघर्षातही श्रीरंग बारणे यांनी पवारांवर मात केली होती. आता दुस-या संघर्षात देखील बारणे हे पवारांना सरस ठरले आहेत. बारणे यांनी पवार कुटुंबातील सदस्याचा पहिल्यांदाच पराभव केला आणि तोही तब्बल दोन लाखाच्या मताधिक्याने…राज्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागले. पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव केल्याने बारणे राज्यभरात चर्चेत आले आहेत.

श्रीरंग बारणे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 25 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. काँग्रेसमध्ये असताना सन 2000 मध्ये झालेली स्थायी समिती सभापतीची निवडणूक गाजली होती. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता होती. स्थायी समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीने श्याम वाल्हेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसचे नगरसेवक असलेले श्रीरंग बारणे यांना बंडखोरी करत स्थायी समिती सभापतीची निवडणूक लढविली.

  • राष्ट्रवादी आणि बारणे यांच्याकडे समान मते होती. त्यावेळी गुप्त मतदान होते. स्थायी समिती सभापतीची निवडणूक दोन वेळा झाली होती. दोन्ही वेळी दोनही उमेदवारांना सम-समान मते पडली होती. त्यामुळे स्थायी समितीचा सभापती महासभेत निवडण्याचा ठरले. महासभेत झालेल्या निवडीत बारणे यांना एका मताने विजय मिळविला होता आणि पहिला बंडखोर सभापती होण्याचा मान मिळविला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. तर, बारणे यांना शिवसेना-भाजपची साथ मिळाली होती. काँग्रेसचे दिवंगत नेते रामकृष्ण मोरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेने बारणे यांना रसद पुरविली होती. ही निवडणूक राज्यभरात गाजली होती. या प्रतिष्ठतेच्या लढतीत बारणे यांनी वाल्हेकर यांचा पराभव करत अजितदादांना चितपट केले होते. तेव्हापासून त्यांच्यात वैर होते.

  • मावळ लोकसभा निवडणुकीत अजितदादा आणि श्रीरंगअप्पा यांच्यात दुसरा संघर्ष झाला. या संघर्षात बारणे यांनी दस्तरखुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला पराभवाची धूळ चारली. हा पराभव पार्थ पवारांचा नसून तो अजित पवारांचाच आहे, असे बारणे सांगतात. पार्थच्या प्रचाराची सुत्रे अजित पवार यांनी स्वत: हाती घेतली होती. माझी लढाई पार्थ यांच्याशी नसून अजित पवारांशी असल्याचे बारणे सांगत होते. पवार आणि बारणे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.

या लढतीत बारणे यांनी पार्थ पवार यांचा तब्बल दोन लाखाच्या फरकाने पराभवाची धुळ चारली. पवार कुटुंबातील सदस्याचा पहिलाच पराभव केला तोही दोन लाखाच्या मताच्या फरकाने. त्यामुळे बारणे राज्यभरात चर्चेत आले आहे. दुस-या संघर्षात देखील अप्पा बारणे यांनी अजितदादांवर मात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.