Pimpri : सात नक्षलवाद्यांचा एन्काउंटर करणा-या जिगरबाज एपीआयचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज – गडचिरोलीतील वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात नक्षलवाद्यांचा एन्काउंटर करणा-या जिगरबाज सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर काळाने झडप घातली. चिंचवड, दळवीनगर येथील रहिवासी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि.8) पहाटे गडचिरोली येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.

योगेश गुजर हे चिंचवड, दळवीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांची 2014 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. गुजर यांनी निगडी, यमुनानगर येथील महापालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करुन यश प्राप्त केले होते. पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर गुजर यांची पहिलीच पोस्टींग गडचिरोली येथे झाली होती. नक्षलवादी परिसर असलेल्या गडचिरोली परिसरात त्यांनी अंत्यत चांगली कामगिरी केली.

योगेश गुजर यांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये सात नक्षलवाद्यांचा एन्काउंटर केला होता. मोठ-मोठ्या नक्षलवाद्यांचा त्यानी खात्मा केला. या कारवाईची बक्षिसी म्हणून थेट राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दोन महिन्यापूर्वी योगेश गुजर यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय)पदी बढती दिली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश गुजर यांचा दोन वर्षांपूर्वीच थेरगाव येथे विवाह झाला होता.

शुक्रवारी (दि.8) पहाटे योगेश गुजर यांचे हृदविकाराच्या झटक्याने गडचिरोली येथे निधन झाले. त्यांच्यावर चिंचवड, लिंकरोड येथील स्मशानभूमीत आज (शनिवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यदक्ष अधिकारी गेल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, गडचिरोलीतील पोलीस अधिकारी, निगडीतील महापालिकेच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.