Pimpri: शहरवासियांनो, अर्थसंकल्पासाठी दहा लाखापर्यंतची कामे सुचवा ; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2019-20 या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्जाद्वारे कामे सुचविता येतील. आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने 2007-08 या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार, अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पध्दतीने व्हावेत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादे काम अर्थसंकल्पात सुचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च दहा लाख रुपयापर्यंत असावा एवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. कचरापेटीची व्यवस्था, पदपथ तयार करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृध्दांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात. योग्य सूचनांचा समावेश महापालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो.

महापालिकेने 2019-20 या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरूवात केली आहे. अर्थसंकल्पात कामे सुचविण्यासाठी महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची शहानिशा करून संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.