Pimpri : लॉकडाऊनच्या काळात भटक्या भुकेल्या श्वानांची भूक भागवण्यासाठी पुढे या !

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात शहरातील भटक्या भुकेल्या श्वानांची भूक भागविण्यासाठी एक गट पुढे आला आहे. या गटाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील श्वानांना अन्न पुरविले जाते. मात्र, त्यांच्या प्रयत्न संपूर्ण शहरातील भटक्या श्वानांना अन्न पुरविण्याचा आहे. त्यासाठी त्यांना अन्न आणि आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे या गटाकडून या भुकेल्या श्वानांची भूक भागविण्यासाठी सहृदयतेने पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आकांक्षा मिश्रा, ओजस कुलकर्णी, सिद्धेश मेहेर, श्रुती बोरा, शशांक मिश्रा, प्रतीक गावडे, अखिलेश नायर, भूषण धाकड, राहुल पलांडे, अक्षय सावंत, श्वेता अग्रवाल या स्वयंसेवकांचा गट हे काम करत आहे. सुरुवातीला 60 ते 70 कुत्र्यांना अन्न पुरवण्यास सुरवात केली. सध्या दररोज 200 हून अधिक कुत्र्यांना खायला दिले जात आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुरेसा अन्नसाठा नसल्याने वाढणारी भूक भागवली जात नाही.

संपूर्ण चाकण एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी, मोरवाडी क्रॉसरोड व ऑटो क्लस्टर रोड, चिंचवड स्टेशन रोड, मोहननगर, परिवहन नगर, लोढा बेलमंडो पर्यंत किवळे क्रॉसरोड, रावेत क्षेत्र, मोरया गोसावी चिंचवड, केशवनगर चिंचवड, काकडे पार्क चिंचवड या भागातील भुकेल्या श्वानांना गटाकडून अन्न पुरविले जाते आहे. वाकड ते किवळे पर्यंत महामार्ग बाजूने, औंध रावेत महामार्ग, नाशिक फाटा ते मोशी, संपूर्ण मोशी परिसर, निरामय हॉस्पिटलपासून चिंचवड गावपर्यंत, त्रिवेणी नगर, रुपी नगर, स्पाईन रोड, तळवडे रस्ता या ठिकाणी पुढील काळात अन्न पुरवठा करण्याचा गटाचा मानस आहे.

यूएसएमधील एका महिलेनेही संपर्क करून तीन पोती कुत्र्याचे अन्न या उपक्रमासाठी दिले आहे. सध्याच्या देणगीनुसार अपुरा अन्नसाठा असल्याने दिवसाआड अन्न दिले जात आहे. काही श्वान खूप दिवसांपासून उपाशी आहेत. काही जखमी देखील आहेत. या मुक्या प्राण्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करता येणार नाही. गटाकडून शक्य तेवढया कुत्र्यांना निवारागृहात सोय केली जात आहे. मागील काही दिवसात काही दानशूर व्यक्तींनी मदत केली. मात्र, ही मदत देखील अपुरी असल्याने आणखी मदतीची गरज आहे.

सध्या 300 पेक्षा जास्त श्वानांना अन्न दिले जाते. त्यामुळे दिवसाला किमान 60 किलो अन्न मिळणे आवश्यक आहे. ‘आपण आम्हाला थेट कुत्र्यांचे अन्न (पेडीग्री) देऊ शकता किंवा आम्ही ते आपल्याकडून संकलित करू शकतो. एखादी व्यक्ती आम्हाला दररोज 1 किलो चिकन देण्याची जबाबदारी घेऊ शकते. आपण प्रत्यक्ष जाऊन अन्न विकत घेऊ शकत नसल्यास केवळ आपण आमच्यासाठी गूगल पे करू शकता. आम्ही खरेदी केलेले समानाचे फोटो आम्ही तुम्हाला पाठवू’, असे आवाहन या गटाकडून करण्यात आले आहे.

मदतीसाठी गूगल पे आणि पेटीएम क्रमांक –
आकांक्षा मिश्रा 8149391916
 श्रुती बोरा  9595436724

खराळवाडी येथील सुधीर दळवी आणि त्यांची मुलगी पूजा दरोरोज ७०-७५ श्वानांना अन्न पुरवितात. दररोज सकाळी पहाटे निघून भुकेल्या श्वानांना पदरमोड करून खाऊ घालतात. याचप्रमाणे शहरातील अनेक प्राणिप्रेमी अशा प्रकारची सेवा करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.