Pimpri : भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे; आमदार जिग्नेश मेवाणी यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. पिण्याचे पाणी देण्याची सरकारची यांची औकात नाही. सत्ताधारी भाजपकडून गायीचा मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्यांवरून भरकटवले जाते. केवळ एक राष्ट्र व अस्मिता यावरून भावनिक आवाहन करतात, अशी टीका गुजरातमधील आमदार व आरडीएएमचे राष्ट्रीय अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी केली. तसेच विधानसभेला भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे असेही ते म्हणाले.

संविधान दिन सोहळा समिती, पिंपरी चिंचवड शहर व आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे बुधवारी (दि.18) आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मेवाणी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, डॉ. सुरेश माने उपस्थित होते.

भाजपाला गुजरातेत आम्ही रोखू शकलो नाही. मात्र महाराष्ट्रात तुम्ही रोखा. त्यासाठी सर्व पक्षांनी भाजपाच्या विरोधात एकत्र आले पाहिजे. अन्यथा विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या 80 जागाही येणार नाहीत, असे सांगत आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले,”जनतेने सांगितले नाही मात्र, यांनीच महाजनादेश यात्रा काढली आहे. शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. पिण्याचे पाणी देण्याची यांची औकात नाही. गायीचा मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्यांवरून भरकटवले जाते. केवळ एक राष्ट्र व अस्मिता यावरून भावनिक आवाहन करतात”

विविध जातींचे ते केवळ एक पॅकेज आहे. देशातील अस्पृश्यता संपुष्टात येत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सांगितले आहे की, मनुवाद व पुंजीवाद आपले शत्रू आहेत. सध्या त्यांचे महागठबंधन झाले असून, ते आपल्याला तोडावे लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असेही ते म्हणाले.

“गुंडांच्या राज्याला मत देणार नाही, याची शपथ एल्गार परिषदेत घेतली. मात्र खोटे खटले भरले. विचारवंतांना आत टाकले. एका समाजात शंभर पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे मोदी, शहा यांच्यासारखे लोक निवडून आले. सर्व बहुजन समाज एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपले राजकारण पासंगाचे आहे. त्यासाठी बहुजन समाज एकत्र आणायचा आहे” असे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.