Pimpri: उद्योगनगरीतील ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं चाहत्यांना दिली साखरपुडा झाल्याची ‘हार्ट ब्रेकिंग न्यूज’!

Pimpri: 'Apsara' Sonali Kulkarni gives 'Birthday Surprise' to fans, 'Breaking News' about engagement with Kunal Benodekar in February! अखेर 'अप्सरा' अडकणार लग्नाच्या बेडीत, सोनाली कुलकर्णी व दुबईस्थित कुणाल बेनोडेकर यांचा दोन फेब्रुवारीला झाला साखरपुडा

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाच्या अफवांना पूर्णविराम देताना ‘अप्सरा’ सोनालीने असे काही झालेच नाही असं सांगितलं खरं पण काल तिने आणखी एका गोष्टीचा खुलासा करुन या चर्चा खोट्या होत्या हे सिद्ध केलं. अखेर काल सोनालीच्या वाढदिवशी तिने कुणाल बेनोडेकर याच्याशी दोन फेब्रुवारी रोजी दुबईत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिचा दोन फेब्रुवारी रोजी दुबई मरिना येथे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत कुणाल बेनोडेकर याच्याशी साखरपुडा झाला. पिवळ्या, केशरी रंगाच्या भरजरी कांजिवरम साडीतील, भरपूर गजरे आणि दागिने घातलेली सोनाली आणि जांभळी शेरवानी, केशरी धोती घातलेल्या कुणालने एकमेकांना अंगठ्या एक्सचेंज केल्या. त्यानंतर गळ्यात हार घातल्यानंतर सोनालीला 2-2-2020 व सोनाली- कुणाल असे लिहिलेला चांदीचा साखरेचा पुडा देण्यात आला असा फोटो तिने या निमित्ताने शेअर केला आहे.

काल सोनालीचा वाढदिवस होता. याचे निमित्त साधून तिने एक पोस्ट शेअर केली. यात तिने ही गोड बातमी रसिकांशी शेअर केली. यात सोनालीने लिहिले आहे, ‘माझा वाढदिवस संपण्याआधी मला तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे. हा माझा भावी पती, केनो बेनो. (कुणाल बेनोडकर) आमचा दोन फेब्रुवारीला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं. आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या’.

काय करतो कुणाल?

मूळचा लंडनचा असणारा कुणाल व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून तो दुबई येथे वास्तव्यास असतो. लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होण्याची शक्यता आहे. पण तिने याबाबत काहीही सांगितले नाही.

सध्या सोनाली दुबईतच आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या लग्नाच्या अफवांबद्दल सांगताना  असं काही झालंच नाही असं स्पष्ट सांगितले होते. त्याचबरोबर लग्नाबाबत तिची कोणती स्वप्नं आहेत, याबद्दलही सांगितलं.  लॉकडाउनमध्ये ती पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.  दररोज तिच्या आवाजात वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते.

पण सोनालीने तिला चार विविध पद्धतींनुसार लग्न करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. तिची आई पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतींनुसार, तसेच महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार, ख्रिश्चन लग्नाबद्दल विशेष आकर्षण असल्याने त्या पद्धतीनुसार आणि होणाऱ्या जोडीदाराची जी पसंत असेल त्यानुसार लग्न, अशा चार पद्धतींनुसार लग्न करण्याचं स्वप्न असल्याचं सोनालीने चाहत्यांना सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.