Pimpri : पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? – सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर हे आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साठे यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यभर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवनाधरण देखील रविवारी (4 ऑगस्ट) 97 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यामुळे धरणातून रात्रीपासून 20 हजार 500 क्यूसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

  • पिंपरी चिंचवड शहरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. शहरातील सखल भागातील सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. मात्र, शहरातील बहुतांशी भागात पिण्याची पाण्याची टंचाई आहे. हे म्हणजे ‘‘धरण उशाला आणि कोरड घशाला’’ अशी परिस्थिती आहे.

दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सेनेच्या पदाधिकारी व आयुक्तांनी शहराच्या पाणी नियोजनाकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे मागीलवर्षी प्रमाणेच या वर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी कपात सुरु आहे. धरण भरून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप व इतर विरोधी पक्षांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

  • मात्र, आयुक्त हर्डीकर हे आपल्या हटवादी भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. सत्ताधारी खासदार आणि आमदारांच्या विनंती पत्राला कच-याची टोपली दाखविणारे आयुक्त आता पाणीकपात रद्द करण्यासाठी ‘‘आरएसएस’’च्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? असा सवाल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.