Pimpri : छत्रपतींचा जिरेटोप परिधान करावा इतकी यांची पात्रता आहे का??  – इम्रान शेख

महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात मूक निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज – वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे  नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केल्यानंतर  विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने प्रफुल्ल पटेल तसेच महायुतीच्या नेत्याच्या विरोधात आज(दि.15 मे) रोजी मूक निषेध आंदोलन केले. पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घालण्याचे प्रफुल्ल पटेल यांचे धाडस कसे झाले,उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का??? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख(Pimpri)यांनी केला.

इम्रान शेख म्हणाले “छत्रपती शिवरायांची भूमिका करताना अनेक लोक,अगदी शाळकरी मुलं त्यांची वेशभूषा करतात,डोक्यावर जिरेटोप घालतात.तो अभिनय असतो,नक्कल असते.सामान्य माणसांना हे समजत म्हणून कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत. मात्र प्रफुल्ल पटेलांनी जे केलेलं आहे ते  लाचारीची परिसीमा आहे.” जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो,परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे.

पुढे बोलताना इम्रान शेख(Pimpri )म्हणाले, महायुतीचे नेते दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमा खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापुढे कदापि सहन केला जाणार नाही. महाराजांचा अवमान करणाऱ्या महायुतीला आणि भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही.

Pimpri : प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी – काशिनाथ नखाते

कामगार नेते काशीनाथ नखाते,सागर तापकीर,मेघराज लोखंडे,कमलेश वाळके,सचिन निंबाळकर,अथर्व शिंदे,यशस नितेश,मयूर खरात,आशिष खत्री,अजय पवार,राजेश हरगुडे, बाबीत बनसोडे,नवनाथ साबळे,हनिफ अत्तर,अभिषेक गिरी,नितीन मोरे,अशरफ शेख,मोसीम शेख,सत्यम साळवे,नियमात शेख,शाहिद शेख,प्रदीप जगताप,सलमान खान ,मोसीम शेख,ऋषिकेश गरडे,बबीता बनसोडे,सूरज देशमाने, रेखा मोरे,समाधान अचलखांब आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.