Pimpri: आनंदनगरमधील नागरिकांची क्वारंटाईनची व्यवस्था ‘ऑटो क्लस्टर’मध्ये करा – योगेश बाबर

Arrange quarantine of citizens of Anandnagar in 'Auto Cluster' - Yogesh Babar

एमपीसी न्यूज – चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नागरिकांनी क्वारंटाईन करण्यासाठी चिंचवड येथीलच ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र 1 व 2 येथे विलगीकरण व्यवस्था उभारावी. तसेच सर्व प्रभागात मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालयाचे वर्ग, सभागृहाच्या ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की,  गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर भागात  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधितांना तातडीने क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे.

या विभागात आनंदनगर वगळता मोरवाडी, इंदिरानगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर यानागरी वस्त्या आहेत. या सर्व विभागात कोरोनाचा फैलाव झाल्यास, कोरोना बाधितांचे विलगीकरण करण्यासाठी मध्यवर्ती आणि एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने बेड्सची व्यवस्था करता यावी. याकरिता अॅटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र 1 आणि 2  येथे व्यवस्था करण्याबाबत तातडीने विचार करावा.

31 मे पर्यंत लॉकडाऊन असला. तरी,  पिंपरी- चिंचवडला रेडझोन मधून वगळले आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार अशा सर्व स्तरावर अटी/शर्थी सह कामकाज सुरु करण्याबाबत सवलत देण्यात आली आहे. कामासाठी अथवा खरेदीसाठी शहरातील नागरिक बाहेर पडणार असल्यामुळे रहदारी आणि संपर्क वाढणार आहे.

पुढील महिन्यापासून पावसाळा सुरु होणार आहे.  पावसाळ्यात साथीचे रुग्ण वाढतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणि पर्यायाने कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढल्यास, विलगीकरण आणि उपचारासाठी रुग्णालया मधील बेड्सची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे.

प्रत्येक प्रभागात विलगीकरण आणि उपचारासाठी मंगल कार्यालय, शाळा,  महाविद्यालयांचे वर्ग आणि सभागृह ताब्यात घ्यावेत. संबंधित प्रभागातील कोरोना बाधितांची  त्याच विभागात व्यवस्था करावी.

यामुळे महामारीच्या संकटकाळात, विषयाचे राजकारण होणार नाही. तसेच कोरोना बाधितांची योग्य ती व्यवस्था करता येईल. त्यादृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात.

आगामी काळात कोरोना संसर्ग वेगाने वाढला  आणि  विलागीकरण आणि उपचार याबाबतीत व्यवस्था अपुरी पडल्यास, नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्यास आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याबाबतीत  प्रशासन म्हणून आपण जबाबदार राहाल, असे बाबर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.