Pimpri : घरफोड्या करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – घरफोडी चोरी करणा-या एका सराईत आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील तीन, वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुरेश ऊर्फ सोन्या गोरख जाधव (वय 28, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेत असताना पोलीस नाईक अमित गायकवाड यांना माहिती मिळाली की, सराईत आरोपी सुरेश त्याच्या राहत्या घराच्या परिसरात फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चिखली येथे घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यावरून त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांकडे देण्यात आले आहे.

  • सुरेशवर 10 घरफोडीचे गुन्हे दाखल
    सराईत आरोपी सुरेश यांच्याकडे पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्याने चिखली पोलीस ठाण्यात तीन, वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून एकूण पाच गुन्ह्यातील 170 ग्रॅम सोन्याचे दागिने, एलईडी टीव्ही असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुरेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 10 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, अमित गायकवाड, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.