Pimpri: टँकर लॉबीच्या फायद्यासाठीच कृत्रिम पाणी टंचाई, विरोधकांचा आरोप; सत्ताधा-यांचे प्रशासनावर खापर

एमपीसी न्यूज – शहरवासियांना आठ दिवस दररोज पाणीपुरवठा केल्यानंतर महापालिकेने आजपासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात लादली आहे. टँकर लॉबीच्या फायद्यासाठीच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. तर, सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रशासनावर खापर फोडले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. तरी, देखील शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, टँकर लॉबीसाठीच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे.

  • ऐन सणासुदीत शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. टँकर लॉबीच्या फायद्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या पाणी कपातीच्या निर्णयाला प्रशासनाची साथ आहे. पाणी कपात रद्द करुन शहराला दररोज समान आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा.

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवना धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. शहरात नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक सल्लागार महापालिकेने आतापर्यंत नेमले. स्काडा आणि चोविस तास पाणीपुरवठा योजना हाती घेतली.

  • पाणी पुरवठ्यावर महापालिका वर्षाकाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, प्रशासन जाणीवपूर्वक शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत आहे. पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.