Pimpri : उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले असतानाही शहरातील उमेदवार जाहीर झाले नाहीत. अर्ज भरण्यास तीन दिवस शिल्लक असतानाही उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. केवळ शिवसेनेने पिंपरीच्या उमेदवाराला एबी फॉर्म देत उमेदवार जाहीर केला आहे.

भाजप-शिवसेनेच्या महायुतीची घोषणा झाली आहे. परंतु, जागा वाटप मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. कोण कोणती जागा लढविणार आहेत, मित्र पक्षांना किती जागा दिल्या आहेत, त्याची कोणतीही माहिती दिली नाही. बंडाळी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून दक्षता घेतली जात आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित असून त्याची घोषणा उद्या बुधवारी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अर्ज भरण्यास तीन दिवसच शिल्लक असताना प्रमुख राजकीय पक्षांनी पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे इच्छुक गॅसवर आहेत. केवळ शिवसेनेने पिंपरी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाने) नाराजी व्यक्त केली आहे.

चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांची घोषणा झाली नाही. चिंचवड मतदारसंघ भाजप तर भोसरी मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, अद्याप कोणता मतदारसंघ कोणाला सुटणार हे जाहीर केले नाही. त्यामुळे युतीच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. युती झाल्याने अनेकांचे निवडणूक लढविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

तर, शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार आहे. राष्ट्रवादीने देखील शहरातील एकही उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज मात्र नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.