Pimpri : महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील शिपाई, मजुरांच्या बदलीचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना

एमपीसी न्यूज – प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी आणि कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील शिपाई आणि मजूर या पदांवरील कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

सरकारी कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध नियम 2013 नुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 72 मध्ये आयुक्त हे त्यांच्या हाताखाली काम करणा-या दुय्यम अधिका-यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी सोपविण्यात आलेल्या अधिकारांची यादी प्रसिद्ध करतील, अशी तरतुद आहे. त्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विभागप्रमुख गट अ आणि गट ब च्या अधिका-यांना 29 ऑगस्ट 2013 आणि 2 जानेवारी 2016 रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता येण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज कार्यक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने काही अधिकार प्रदान करणे आवश्यक आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चतुर्थ श्रेणीतील शिपाई आणि मजुर या पदांवरील कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार, चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांच्या त्यांच्या कार्यरत विभागातून अन्य विभागामध्ये किंवा इतर क्षेत्रीय कार्यालयात बदली करण्याचे अधिकार सहायक आयुक्तांना बहाल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.