Pimpri: सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांची भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राज्य सरकारकडील प्रतिनियुक्तीवरील सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांची भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचा आदेश सहसचिव सं.श.गोखले यांनी काढला आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे ओढवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे डॉ. अष्टीकर यांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात 14 ऑगस्ट रोजी कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. 16 ऑगस्ट रोजी त्यांची पिंपरी महापालिकेतून भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. तथापि, कोल्हापूर महापालिकेकडे केलेली सेवा परत केल्यानंतरच अष्टीकर यांनी भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

  • अष्टीकर यांची 17 डिसेंबर 2015 रोजी पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांची महापालिकेत पावणेचार वर्ष सेवा झाली. सध्या त्यांच्याकडे करसंकलन, अभिलेख कक्ष, निवडणूक, आधार व जनगणना, क्रीडा विभागाचा पदभार होता. तसेच त्यांनी एक वर्ष प्रभारी अतिरिक्त आयुक्त म्हणूनही कामकाज पाहिले आहे.

अष्टीकर यांच्याकडील करसंकलन व अभिलेख कक्ष विभागाची जबाबदारी सहाय्यक आयुक्त सुनील वाघमारे यांच्याकडे दिली आहे. तर, निवडणूक, आधार व जनगणनासह क्रीडा विभागाचा पदभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे देण्यात आला आहे. भांडार आणि भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडील भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे दिला आहे. तर, भूमी आणि जिंदगी विभागाचा अतिरिक्त पदभार चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

  • तीन सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त!
    पिंपरी महापालिकेत 11 सहाय्यक आयुक्‍तांची पदे मंजूर आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी आहेत. महापालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे दोन आणि राज्यकर विभागाचे एक असे तीन सहायक आयुक्त कार्यरत आहेत. भांडार विभागाचे मंगेश चितळे, नागरवस्ती विभागाच्या स्मिता झगडे आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सुनील वाघमारे कार्यरत आहेत. तर, महापालिका सेवेतील प्रशासन अधिकारी मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’ प्रभागाच्या क्षेत्रिय अधिकारी आशादेवी दुरगुडे, ‘ब’ प्रभागाचे संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहायक आयुक्त आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.