Pimpri : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळा अन् दुष्काळी जनतेला मदत करा

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यातील जनता सुलतानी दुष्काळी संकटाला सामोरे जात आहे. त्यांना जनावरांच्या चा-यांचा, रोजगारांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ‘जीवन जगायचे कसे?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असून अनेकांनी दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे स्थलांतर करु लागले आहेत.

  • या गंभीर प्रश्नामुळे पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दि.15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिग्ज, फ्लेक्स, हार, बुफेवरील अनावश्यक खर्च कार्यकर्त्यांनी टाळून ‘फूल ना, फुलाची पाकळी म्हणून’ दुष्काळी जनतेला मदतीचा हातभार लावावा, असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. यावेळी उपमहापैार सचिन चिंचवडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पक्षनेते पवार म्हणाले, राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यात जनावरांचा चारा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्यास्थितीत जाणवू लागली आहे. उन्हाळ्यात तर याहूनही गंभीर परस्थिती निर्माण होणार आहे. शेतमजुराच्या हाताला काम नसल्याने अनेकांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.

  • दुष्काळी भागात शेतकऱ्यांचं विज बिल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क वसुलीही भाजप सरकारने माफ केली आहे. त्यामुळे यंदा भाजप शहराध्यक्ष तथा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व हिंतचिंतक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळण्यात यावा, तो खर्च दुष्काळी बांधवांना मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित निधी संकलन करावे, याकरिता शहर भाजप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.