Pimpri : सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून पाणी फाऊंडेशनला आर्थिक मदत

उद्धव बाबूराव गायकवाड यांनी जपली सामाजिक बांधिलकी

एमपीसी न्यूज – आयुष्यातील 35 वर्षांचा मोठा टप्पा ज्या सहका-यांसोबत काम केले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांचा निरोप घेण्याची वेळ आली. 35 वर्षे सोबत काम केल्याने आत्मीयता, जिव्हाळा आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले. त्यातून निवृत्ती समारंभासाठी खर्च करणं, हे स्वाभाविकच आहे. पण, संपूर्ण राज्य दुष्काळाच्या झळा सोसत आहे. राज्यातील माय-माऊली पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करत आहे. हे भयाण वास्तव समोर असताना सेवानिवृत्तीच्या नावावर अनाठायी होणारा खर्च म्हणजे जिवावरचे ओझेच. त्यातच पाणी फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेले काम अतिशय अतुलनीय आहे. त्याला प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, या भावनेतून सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च टाळून ती रक्कम पाणी फाउंडेशनला देण्यात आली. सेवानिवृत्तीचा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत सध्या पद्धतीने घेतली. हा आदर्श घालून दिला आहे, केंद्र सरकारच्या संरक्षण खात्यातील खडकीतील 512 आर्मी बेस वर्कशॉपमधील अधिकारी उद्धव बाबूराव गायकवाड यांनी…..

गायकवाड यांनी पाणी फांऊडेशनचे सदस्य डॉ. बापू तारसे आणि संजय पानसरे यांच्याकडे 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. त्याचबरोबर पुण्यातील श्रीकृष्ण गोशाळेला 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. गायकवाड कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील घरतवाडीचे रहिवाशी आहेत. नोकरी लागल्यामुळे गायकवाड कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. घरची अत्यंत बेताची परिस्थिती होती. हलाखाची जीवन जगले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेने त्यांनी आजपर्यंत सामाजिक कार्यासाठी सातत्याने मदत केली आहे.

  • उद्धव गायकवाड 1983 साली आर्मी वर्कशॉपमध्ये रुजू झाले. त्यांनी 35 वर्ष सेवा केली. ते 31 मे 2019 रोजी अधिकारी पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेकांच्या सेवानिवृत्ती बघितल्या आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमांवर होणार अनाठायी खर्च बघितला आहे. विनाकारण पैशांचा अपव्यव होत असल्याची सल त्यांच्या मनात कायम होती.

अनाठायी खर्च करण्याऐवजी ती रक्कम सत्कारणी लागायला हवी. ज्यामुळे नवीन ऊर्जा मिळेल. सामाजिक हित साधले जाईल. असा त्यांचा नेहमी आग्रह होता. आता ते स्वतः निवृत्त होत आहेत. त्यातच उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. उन्हाने प्राण कासावीस होत असून पाण्याची शोधाशोध सर्वत्र होत आहे. राज्य एका मोठ्या संकटाचा सामना करत असताना आपण निवृत्तीच्या कार्यक्रमाचा आनंद साजरा करणं गायकवाड यांना रुचले नाही.

  • सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. गायकवाड यांनी गावची नाळ तुटू दिली नाही. गावची ओढ कधी कमी झाली नाही. गायकवाड यांनी स्वत: वाढदिवस कधीच मोठ्या दिमाखात साजरा केला नाही. वाढदिवाचा अनावश्यक खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेला मदत केली आहे. वाढदिवस, निरोप समारंभावर अनाठायी, आवजवी खर्च करु नये. त्यापेक्षा समाजिक कार्यासाठी मदत करावी. त्यातून वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे सर्वांनी समाजासाठी मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले.

उद्धव गायकवाड म्हणाले, ”राज्यातील जनता सुलतानी दुष्काळी संकटाला सामोरे जात आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी तसेच रोजगाराचा प्रश्‍न गंभीर आहे. ‘जीवन जगायचे कसे?’ असा प्रश्‍न दुष्काळी भागातील जनतेसमोर आहे. अनेकजण दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे स्थलांतर करु लागले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून दुष्काळी भागातील जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी सामाजिक भान जपून अनाठायी खर्चाला फाटा द्यावा. समाजासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.