Pimpri : शहरात घरोघरी साधेपणाने बकरी ईद साजरी

ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या सामूहिक नमाज पठणाचा सोहळा रद्द करण्यात आला होता. : bakri Eid is simply celebrated from house to house in the city

0

एमपीसी न्यूज – त्याग, संयम आणि विश्वशांतीचा संदेश देणारा ‘ईद उल अजहा’ म्हणजेच ‘बकरी ईद’ हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहूनच मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली व कोरोनासारख्या महामारीतून जगाची सुटका करावी अशी दुवा अल्लाकडे मागितली.

ईदच्या निमित्ताने दरवर्षी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून सुगंधी अत्तर लावून ईदची नमाज ईदगाह, मशीद व मदरसा येथे सामुहिकरित्या अदा करतात.

परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी यंदाची ईद राज्यशासनाच्या आदेशानुसार घरोघरी नमाज अदा करून साधेपणाने साजरी केली.

लॉकडाउन नियमावली नुसार सामूहिकरीत्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. त्यामुळे ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या सामूहिक नमाज पठणाचा सोहळा रद्द करण्यात आला होता.

नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच नमाज पठण करावे. शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये एकत्र न येता आपापल्या घरी नमाज पठण करून बकरी ईद साजरी केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील इदगाह मैदान, मशिद, मदरसा या परिसरात शुकशुकाट होता. तसेच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like