Pimpri : खासदार बारणे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर बाळासाहेब दिसतात – संजय राऊत 

एमपीसी न्यूज – मावळ मतदार संघाची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती असेलेले  पुस्तक खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिले आहे. साहित्यिक मूल्य असलेले आणि अत्यंत सोप्या भाषेत  लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कुलदैवत असलेली एकविरा देवी मावळ मतदार संघात आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नानातून साकारलेला मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस’वे याच मतदार संघात आहे. यामुळे या पुस्तकाचे मोठे महत्व असून पुस्तकाच्या पानापानावर बाळासाहेब दिसत आहे, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच खासदार बारणे यांच्या सारखे प्रत्येक खासदार, आमदाराने मतदार संघाची माहिती असलेले पुस्तक लिहावे, असेही ते म्हणाले.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी  ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ या लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 8) खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, मावळ जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिरुरच्या संघटिका सुलभा उबाळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत को-हाळे उपस्थित होते.

अयोध्येची लढाई करायची ठरल्यावर अयोध्येची माहिती घेण्यासाठी आम्ही पुस्तक शोधत होतो. खासदार, आमदार, जिल्हाधिका-यांकडे पुस्तकासंदर्भात विचारणा केली. परंतु, अयोध्या गावाची माहिती असलेले एकही अधिकृत पुस्तक मिळाले नसल्याचे सांगत राऊत म्हणाले, “खासदार बारणे यांनी मावळ मतदार संघाची माहिती असेलेले जे पुस्तक लिहिले आहे आणि त्याची माहिती दिली आहे. त्याचे महत्व वाटत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत असलेली एकविरा देवी मावळ मतदार संघात आहे. मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस’वे व्हावा हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. राज्यात सत्ता येताच त्यांनी हा ‘एक्सप्रेस’वे करुन घेतला. या संपुर्ण पुस्तकामध्ये बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. पुस्तकाच्या पानापानावर बाळासाहेब दिसत आहेत. यामुळे या पुस्तकाचे महत्व आहे”

साहित्यिक मूल्य असलेले हे पुस्तक आहे. मावळात नव्हे तर महाराष्ट्रात हे पुस्तक गेले पाहिजे. सोप्या भाषेत लिहिले आहे. राजकारण्याचा हात लिहिता आणि तोंड बोलके असले पाहिजे. प्रत्येक खासदार, आमदाराने माझा मतदार संघ असे पुस्तक लिहिणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र खूप मोठा आहे. आख्खा महाराष्ट्र हा मावळ प्रांतात आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य गोष्टी या मतदार संघात आहेत, असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, “मावळात क्रांतीची ठिणगी पडली आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पहिले आद्य क्रांतीकारक मावळातील होते. एका घरातील फासावर गेलेले चापेकर बंधु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि त्यांचे राज्य सुद्धा या जिल्ह्यात येत  आहेत. अशा या मावळ प्रातांचे नेतृत्व खासदार बारणे करत आहेत. खासदार बारणे यांनी लेखणी हाती घेतली आहे. चांगले लिहित आहेत. नगरसेवक असताना दोन पुस्तके लिहिली आहेत. 2019 नंतर बारणे यांना  सतत पुस्तके लिहिवी लागणार आहेत. इतक्यावेळा ते खासदार होणार आहेत. संसदेच्या समृद्ध ग्रंथालयात बारणे यांची पुस्तके ठेवावी लागणार आहेत”

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “भारतातील सर्वात मोठे मंदिर संसद भवन आहे. खासदार बारणे त्याचे नम्र उपासक आहेत. राज्यातील लोकभावना, भाषा, संस्कृती यावर बारणे वेळोवेळी संसदेत आवाज उठवितात. मावळ मतदार  संघ खूप समृद्ध आहे. तुकोबांच्या अभंगवानीने महाराष्ट्र फुलला आहे. खासदार बारणे यांनी देशाच्या पंतप्रधानांना तुकोबांची अभंगवाणी भेट दिली आहे. अध्यात्मिक परंपरेचा वारसा घेऊन ते काम करत आहेत.  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्ञानोबा-तुकोबांची पताका संसदेत पोहचविणारे खासदार बारणे भाविक आहेत. पुस्तकामध्ये मतदार संघातील पंरपरा, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक, स्त्रोत, श्रद्धास्थान याची  संपूर्ण माहिती दिली आहे. जाणीवेची माहिती देणारे आणि माहितीची जाणीव करुन देणारे हे पुस्कत आहे”.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मावळ मतदार संघ शहर, ग्रामीण, आदिवासी अशा भागात विभागाला गेला आहे. मतदार संघातील नागरिकांच्या बोली-भाषा वेगळ्या आहेत. कर्जत परिसरातील आदिवासी पाड्यावर आजपर्यंत वीज पोहचली नव्हती. मी ‘शिव प्रकाश’ योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात वीज पोहचविली आहे. नागरिकांना सहज समजावा त्यासाठी पुस्तक लिहिले आहे. मतदार संघातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यटन स्थळे याची माहिती पुस्तकात आहे. यापूर्वी ‘शब्दवेध’,  ‘लढवय्या’  ही दोन पुस्तके प्रकाशित केली असून हे तिसरे पुस्तक आहे. आगामी काळात आणखीन एक पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.