Pimpri : सावरकरांच्या बदनामीसाठी काँग्रेसने वाटलेल्या पुस्तकावर बंदी घाला; आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

एमपीसी न्यूज – काँग्रेसने मध्यप्रदेशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे पुस्तक वाटले आहे. या पुस्तकात सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर वापरण्यात आला आहे. काँग्रेसने केलेला हा प्रकार निंदनीय आहे. त्याचा जाहीर निषेध आहे. या कृतीसाठी हा देश काँग्रेसला कधी माफ करणार नाही. या पुस्तकावर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. तसेच या प्रकरणावर शिवसेना गप्प का आहे?, असा सावलही आमदार जगताप यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान आहे. त्यांनी इंग्रजांविरोधात लढा देण्यासोबत समाजसुधारणेचे देखील काम केले आहे. ते महाराष्ट्राचे सुपूत्र असल्यामुळे प्रत्येक मराठी मनात त्यांच्याविषयी अभिमानाची आणि आदराची भावना आहे. परंतु, काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीचा विडाच उचलला असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आज देशात काँग्रेसची ही अवस्था झालेली दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर आता त्यांच्या बदनामीचे षड्‌यंत्र रचले आहे.

  • काँग्रेसची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये पक्षाच्याच कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामी करणारे पुस्तक वाटण्यात आले आहेत. या पुस्तकात सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलेले आहे. ही बाब कोणताही सावरकर प्रेमी सहन करू शकणार नाही. काँग्रेसला देशात तेढ निर्माण करावयाचे असल्याने अशा प्रकारची कृत्या या पक्षाकडून सुरू आहेत. सावरकरांबाबत काँग्रेस जे काही वागत आहे, त्यासाठी हा देश या पक्षाला कधीही माफ करणार नाही.

सावरकरांबाबत सूडबुद्धीने वागणाऱ्या काँग्रेसला या देशाने आधीच धडा शिकवलेला आहेच. परंतु, त्यातून हा पक्ष सुधारण्याऐवजी आणखी चुका करत आहे. परंतु, सावरकरांबाबत काँग्रेस अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन त्यांची कितीही बदनामी केली तरी त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेऊन सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पुस्तकांवर महाराष्ट्रात तातडीने बंदी घालावी. तसेच सावरकरांच्या या बदनामी प्रकरणावर तोंड दाबून गप्प न बसता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.