Pimpri : विवादित जमीन गहाण ठेवून बँकेची साडेदहा कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेताना विवादित 30 गुंठे जमीन गहाण ठेवली. त्याबदल्यात बँकेकडून साडेदहा कोटी रुपये कर्ज घेतले. तसेच ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले, तो व्यवसाय देखील केला नाही. याबाबत दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू सेवाराम तनवानी (वय 56, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर सूर्यवंशी (वय 38), शीतल तेजवानी उर्फ शीतल सूर्यवंशी (वय 35, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून लॉन्स व्यवसायासाठी पिंपरीमधील एका बँकेकडून 10 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेताना आरोपींनी काही मिळकती बँकेकडे गहाण ठेवल्या. त्यामध्ये वाकड येथील 30 गुंठ्यांची जमीन देखील आरोपींनी बँकेकडे गहाण ठेवली. ती जमीन विवादित असल्याचे माहिती असूनही आरोपींनी ही बाब बँकेच्या निदर्शनास आणून न देता जमीन निर्विवाद असल्याचे बँकेला भासवून कर्ज मिळविले. कर्ज ज्या कारणासाठी घेतले तो व्यवसाय देखील सुरु न करता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल बँकेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.