Pimpri: लोकसभेचे मैदान जवळ आले; आरोप-प्रत्यारोप सुरु झाले !

खासदार बारणे, आमदार जगताप यांच्यात जुंपली

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे मैदान जवळ आले असून केवळ सात ते आठ महिन्यांचा अवधी निवडणुकीला राहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कट्टर प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेले मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप-प्रत्योराप सुरु झाले आहेत. खासदार बारणे यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणावरून सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला. त्याला लगेच दुस-या दिवशी आमदार जगताप यांनी थेरगावातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्युत्तर दिले.

खासदार बारणे आणि आमदार जगताप हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोघेही एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहतात. दोघे एकत्र कार्यक्रमात असल्यावर एकमेकांचा ‘नामोल्लेख’ देखील करत नाहीत. चिंचवड विधानसभा मतदार संघातून सन 2009 मध्ये बारणे शिवसेनेचे उमेदवार होते. तर, जगताप यांनी अपक्ष नशीब आजमावले होते. जगताप यांनी बारणे यांच्यावर मात केली. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जगताप यांनी बारणे यांना चांगलेच घेरले होते. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी विधानसभेच्या पराभवाचे उट्टे काढले. जगताप यांच्यावर दीड लाख मताच्या फरकाने विजय मिळवित मावळवर भगवा फडकाविला.

आगामी लोकसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हेही ‘दक्ष’ झाले आहेत. त्यांनी मावळच्या रणांगणात उडी घेतली असून त्यांना बारणे यांच्याकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. त्यामुळे काहीही करुन लोकसभा निवडणूक लढवायची असा संकल्प त्यांनी सोडला असल्याचे, त्यांचे समर्थक बोलत आहेत.

तथापि, जरी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी ऐनवेळी काहीही होऊ शकते. युती झाल्यास शिवसेनेचा विद्यमान खासदार असल्यामुळे शिवसेना मावळ मतदार संघावरील दावा सोडणार नाही. त्यानंतर आमदार जगताप काय भूमिका घेतात, यावर मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे. मतदार संघातील राजकीय परिस्थिती बदल्यामुळे भाजप मावळची निवडणूक लढविणार असल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे युती न झाल्यास भाजपची उमेदवारी जगताप यांना मिळण्याची शक्यता आहे.

चार दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेतील अधिका-यांसोबत बैठक घेतली. शहरातील अतिक्रमणासह विविध प्रश्नांवरुन सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला. तसेच सत्ताधा-यांच्या ‘खाबूगिरी’मुळे शहराचा दर्जा खालावत चालला असल्याचा घणाघात केला होता. त्याला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. थेरगावातील अतिक्रमांणवरुन त्यांच्यावर टीका केली. भाजपला नाकर्ते आणि निष्क्रिय म्हणा-या बारणे यांनी थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला याचे उत्तर द्यावे. तसेच त्यांच्या पक्षांतर करण्यावरुन देखील टीका केली होती.

त्याला बारणे यांना पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळुन खाऊ’ असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचित त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावासी झालेल्या जगतापांनी दुस-या विषयी बोलणे हा मोठा ‘जोक’ आहे. पालिकेतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात जगतापांनी एकदाही तोंड उघडले नाही.

अतिक्रमण आणि खाबूगिरीवर’ आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून वैयक्तिक टीका केली असे सांगत ‘लोगो की समस्यों की बात उठानेपर आमदार जगताप को गुस्सा क्यो आता है’, असा खडा सवालही खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही. तसेच थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही असेही ते म्हणाले. त्याला आता जगताप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकंदरीतच लोकसभा निवडणूक जवळ आल्याने खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. यामुळे शहरवासियांचे मनोरंजन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.