Pimpri : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या भेटीला

कामगारांनी केले बारणे यांचे जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज-  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांची भेट घेतली. यावेळी कामगारांनी बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले.

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आज (गुरुवारी)पिंपरी मतदारसंघात प्रचार दौ-यावर होते. बारणे यांनी संत तुकारामनगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. भोसले यांच्याशी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, महिला संघटिका उर्मिला काळभोर, रोमी संधू उपस्थित होते.

यशवंत भोसले म्हणाले, “पिंपरी महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या फरकाची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहेत. पंरतु, महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून कामगारांची फरकाची रक्कम त्वरित अदा करावी. 37 कोटी रुपये सफाई कामगारांना देण्यात यावे, असे निवेदन भोसले यांनी खासदार बारणे यांना दिले. यासह कामगारांच्या विविध प्रश्नांवर भविष्यात मार्गा काढावा. तसेच अल्फा लावलच्या कर्मचा-यांना न्याय द्यावा. कंत्राटीपद्धत रद्द करुन कायम सेवेत कामगारांना घ्यावे. असे कायदे करावेत” अशी मागणी देखील भोसले यांनी केली.

खासदार बारणे म्हणाले, ”कंत्राटी कामगारांच्या फरकाच्या रकमेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून नक्कीच हा प्रश्न मार्गी लावेन . तसेच अल्फा लावलच्या कर्मचा-यांना देखील न्याय देईन. कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी भविष्यात सातत्याने संसदेत आवाज उठवेन” असे आश्वासन बारणे यांनी दिले. तसेच निवडणुकीत कामगारांची ताकद आमच्या पाठिशी उभी करावी, असे आवाहन बारणे यांनी भोसले यांना केले.

जयदेव अक्कलकोटे, दिनेश पाटील, दीपक पाटील, दीपक आमोले, संतोष टाकळे, योगेश जगदाळे, अमोल घोरपडे, मधुकर काटे या कामगार नेत्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.