Pimpri : सायबर फसवणुकीपासून सावधान ! ‘एक’ मेसेज करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे

(श्रीपाद शिंदे)
एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरील फेक अकाऊंटवरून भुरळ घालून फसविण्याची पद्धत रूढ झाली आहे. वेगवेगळ्या बक्षीस, मोठ्या रकमा, कार, फ्लॅट यांचे आमिष दाखवून तसेच एखादी वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली जात आहे. एक मेसेज मोबाईल फोनवर पाठवून त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. इथेच नागरिक फसतात आणि त्यांचे बँक खाते रिकामे होते.
तुम्हाला अमुक अमुक कंपनी, संस्थेकडून कार, फ्लॅट, बक्षीस, मोठी रक्कम मिळाल्याचा एक मेसेज नागरिकांच्या मोबाईल फोनवर पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये एक लिंक देखील असते. मिळालेले बक्षीस मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असेही सांगितले जाते. काही वेळेला नागरिकांना ठराविक रक्कम पाठवण्यास भाग पाडले जाते. हळूहळू हा आकडा मोठा होत जातो आणि नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून हजारो रुपये उकळले जातात. बक्षीस, पैसे, कार, फ्लॅट हे सर्वकाही मोहमाया असल्याचे त्याच्या फसवणूक झाल्यानंतर लक्षात येते.
सायबर गुन्हेगार मेसेजमधील लिंकद्वारे ठराविक रक्कम पाठवायला सांगतात. ज्यामुळे नागरिकांच्या बँक खात्याची माहिती गुन्हेगारांकडे जाते. यानंतर थोड्याच वेळात नागरिकांच्या बँक खात्याला गळती लागते. अशिक्षित नागरिकांसह सुशिक्षित आणि उच्च शिक्षित देखील याला बळी पडतात. काहीही न करता पैसे, बक्षीस मिळत असल्याचा मोह त्यांना यासाठी उद्युक्त करतो.
सायबर गुन्हेगारांनी बँका आणि मोठ्या कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळे बनवली आहेत. ज्या संकेतस्थळांना नागरिक सर्वाधिक भेट देतात, ज्यावरून आर्थिक देवाण-घेवाण होते, बँक खात्यांची माहिती सहज उपलब्ध होते अशी संकेतस्थळे बनवली जातात. बनावट संकेतस्थळांना नागरिक भेट देतात. त्यावर असलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केला जातो. कधी कधी त्यावर असलेला फॉर्म भरून आपली व्यक्तिगत आणि गोपनीय माहिती भरली जाते. इथून सायबर गुन्हेगारांचा खेळ सुरु होतो. तुमचे एटीएम लॉक झाले आहे. सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा. काही रक्कम एखाद्या खात्यावर भरा, असे सांगितले जाते. नागरिकांची गरज ओळखून त्याचा फायदा घेतला जातो.
रात्रीस खेळ चाले
नागरिकांच्या बँक खात्यांची, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची माहिती मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगारांचा शक्यतो रात्रीस खेळ चालतो. रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास खात्यातून पैसे काढून घेतले जातात. एका दिवशी ठराविक रक्कम काढता येते. रात्री बारा वाजता बँक नियमानुसार दिवस बदलतो. रात्री बारानंतर लगेच दुस-या दिवशीची मर्यादा सुरु होते. त्यामुळे रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या काळात पैसे काढल्यास दोन दिवसांची मुबलक रक्कम काढता येते. याची दोन कारणे आहेत. रात्रीच्या वेळी मोबाईल बंद किंवा सायलेंट असतात. त्यामुळे पैसे काढून घेतल्याचा मेसेज फसवणूक झालेली व्यक्ती लवकर बघत नाही. दुसरे कारण असे की, हा प्रकार जरी लक्षात आला तरी तो थांबवायचा कसा याबाबत माहिती नसते, त्यामुळे सकाळपर्यंत वाट पाहावी लागते. एवढ्या वेळेत सायबर गुन्हेगार सहजपणे आपला हात साफ करून घेतात. हे प्रकार तात्काळ रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर असायला हवा. खात्यातून पैसे कमी झाल्याचे निदर्शनास येताच तात्काळ कार्ड ब्लॉक करावे. पोलिसांशी तात्काळ संपर्क करायला हवा.
ओएलएक्स ग्राहक सायबर गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट
ओएलएक्सवर जाहिरात करणारे सायबर गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. अनेकजण आपली जुनी वस्तू ‘ओएलएक्स’ वर विकण्यासाठी जाहिरात टाकतात. ही जाहिरात पाहून सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीला फोन करतात. चांगली किंमत देऊन वस्तू खरेदी करण्याचे आमिष दाखवले जाते. या व्यवहारांचे पैसे ऑनलाईन देण्याचे ठरवले जाते. नागरिकांकडून गुगल पे, फोन पे किंवा अन्य प्रकारच्या डिजिटल व्यवहारांचा क्रमांक व बँकेची माहिती घेतली जाते. सर्वांकडे यापैकी कोणतेही पर्याय उपलब्ध नसतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी गुन्हेगार नागरिकांच्या फोनवर एक लिंक पाठवतात. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पैसे मिळणार असल्याचे सांगितले जाते. त्याखाली ‘पे टू’ असे लिहिलेले असते. पण नागरिक त्याकडे लक्ष देत नाहीत. आलेल्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट होतात. याबाबत काही कळण्याच्या आतच सायबर गुन्हेगार डिजिटली पळ काढतात.
ओएलएक्स वरून गाडी खरेदी करत असाल तर नागरिकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. कारण ‘मी आर्मीमध्ये आहे. माझी बदली झाली आहे. त्यामुळे माझी गाडी मला तात्काळ विकायची आहे. त्यासाठी कमी किंमत आली तरी चालेल’ असे सांगून नागरिकांना गाडी घेण्यासाठी भावनिक गळ घातली जाते. नागरिकांना पैसे पाठवण्यास सांगितले जाते. पैसे मिळाल्यानंतर गाडी घेण्यासाठी विविध ठिकाणी बोलावले जाते. मात्र, नागरिकांना गाडी मिळत नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. त्यामुळे गाडी मिळाल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये, असे सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे.
सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले, “अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. बँक खात्याची माहिती तसेच गोपनीय पिन क्रमांक आणि ओटीपी शेअर करू नये. फोनवर पैसे पाठवणार असल्याचे सांगून एखादी लिंक आल्यास त्या लिंकच्या खाली ‘पे टू’ आहे कि ‘रिसिव्ह’ आहे, हे तपासूनच लिंकवर क्लिक करावी. अन्यथा आपल्या खात्यावरील पैसे चोरीला जाऊ शकतात. असे प्रकार झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा.”