BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ऑनलाईन शॉपिंग करताय ? मग घ्या ही काळजी !

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. लोकांच्या आवडी-निवडीनुसार, सिझन आणि वयोगटानुसार वस्तूंची उपलब्धता आहे. त्यात गुगलसारख्या विद्यापीठात कोणत्या ग्राहकाला काय हवं याची पुरेपूर माहिती उपलब्ध होत आहे. गुगलमध्ये सर्च केलेल्या इनपुटनुसार गुगलबाबा कोणत्या ग्राहकाला काय हवं आहे, याचा सर्व्हे करतो. सर्च केलेल्या माहितीच्या आधारे गुगल निवडक जाहिराती ग्राहकाच्या मोबाईलवर दाखवतो.

विविध शॉपिंग साईटवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते. त्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. एकाच प्रकारची वेगवेगळ्या आकार, प्रकारची उत्पादने ऑनलाईन शॉपिंग साईटवर बघायला मिळतात. घरबसल्या कित्येक वस्तू बघता येतात. विंडो शॉपिंग करणा-यांसाठी तर इथे मेजवानीच असते. ग्राहकाने पाच टी-शर्ट मागवले आणि त्याला दोनच टी-शर्ट आले. ग्राहकाने कॅमेरा मागवला त्याला वीट आली. मोबाईल मागवला दगड आले. कपडे मागवले कागद आले. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

ऑनलाईन शॉपिंग करताना चुकीचा प्रकार घडल्यास कंपन्यांकडून लवकर जबाबदारी स्वीकारली जात नाही. ग्राहकाने त्यात काही फेरफार केला असेल म्हणून कंपनी हात वर करते. त्यानंतर पोलीस ठाण्यात अनेक चकरा मारून प्रकरण मिटवावे लागते. पोलीस देखील पुरावे नसतील तर तक्रार दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या वस्तूंचे, वस्तू उघडतानाचे आणि फेरफार, फसवणूक झाल्याचे पुरावे असणे आवश्यक आहे.

कधीकधी मोठ्या प्रमाणात सूट देणा-या या साईटच फसव्या असतात. त्यातून ग्राहकांची फसवणूक होते. काही कालावधी पर्यंत शॉपिंग साईट सुरु असतात. पण ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्या, त्याचे पैसे दिले की, साईट बंद झालेल्या आढळतात. काही वेळेला मागवलेली वस्तू येत नाही. कधी मागवलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू ग्राहकाच्या पत्त्यावर पोहोचते. कधी वस्तूऐवजी दगड, विटा बॉक्समध्ये पॅक करून येतात. अशा अनेक प्रकारे फसवणूक होते. त्यातून वाचण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घेणे फार गरजेचे आहे.

ऑनलाईन शॉपिंग करताना अशी घ्या काळजी –

# ज्या शॉपिंग साईटवरून खरेदी करत आहोत, त्याची सत्यता आणि विश्वासार्हता तपासावी. फेक वेबसाईट ओळखून त्यावरून शॉपिंग करू नये.

# वस्तू मागवताना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व्यवस्थित दिल्याची खात्री करा.

# खरेदी करत असलेल्या वस्तूच्या गुणवत्तेबाबत त्या वस्तूसाठी इतर ग्राहकांनी दिलेली रेटिंग आणि फीडबॅक पाहावा.

# ऑनलाईन पेमेंट करताना – क्रेडिट कार्डवरून ईएमआय करत असाल तर त्याचे हप्ते आणि कालावधी लक्षात घ्यावा. अन्यथा माहिती न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या परतफेडीवर घेतलेल्या वस्तूचे पैसे एकाच वेळी खात्यातून कट होतात.

# शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीला प्राथमिकता दयावी. जर क्रेडिट कार्ड अथवा अन्य पेमेंटसाठी सवलत असेल तर त्यानुसार पेमेंट करावे.

# डिलिव्हरी देणा-या कंपन्या थर्ड पार्टी म्हणून काम करतात. दिलेल्या वेळेत डिलिव्हरी देणे आणि अन्य बाबींसाठी वस्तूची डिलिव्हरी झाल्यानंतर बहुतांश कंपन्या रेटिंगसाठी विनंती करतात. त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार त्याला रेटिंग द्यावे. ज्यामुळे भविष्यात संबंधित कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणा-या ग्राहकांसाठी व वस्तू विकणा-या कंपन्यांसाठी फीडबॅक मिळेल.

# शक्यतो डिलिव्हरी देणा-या व्यक्तीसमोर पार्सल उघडावे.

# त्याच्यासमोर पार्सल उघडणे शक्य नसेल तर पार्सल उघडताना व्हिडिओ बनवावा. ज्यामुळे कंपनीकडून अथवा डिलिव्हरी देणा-या कंपन्यांकडून काही गफलत झाली असेल तर ती लक्षात आणून देण्यासाठी उपयोगी ठरेल.

# वस्तूंचा रिप्लेसमेंट कालावधी बघावा. ज्यामुळे वस्तू खराब असेल, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे नसेल तर ती कंपनीने दिलेल्या ठराविक कालावधीत परत पाठवता येईल.

# वस्तू रिप्लेस करण्यासाठी वस्तूंचे बिल, बॉक्स सांभाळून ठेवावे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like