Pimpri : धुलीवंदनाचा आनंद आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच

एमपीसी न्यूज – धुलिवंदनाचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून, वंचित घटकातील मुले, महिला, नागरिकांसोबत मिळून, रंगांची उधळण करून, तर काही ठिकाणी नैसर्गिक रंग लावून हा उत्सव साजरा केला जात आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यातच रंग लावण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे फुगे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. धुलीवंदनाच्या आनंदात शहरभर जागोजागी प्लास्टिक पिशव्यांचा खच पाहायला मिळत आहे.

होलिका दहनानंतर दुस-या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. त्याला अध्यात्मिक कारणे आहेत. पण याकडे दुर्लक्ष करत रंग खेळण्याची परंपरा मात्र सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे. धुलिवंदनादिवशी होळीच्या राखेने धुलिवंदन साजरा करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. आता त्या राखेची जागा रंगांनी घेतली. रासायनिक रंगांना मोठी मागणी असते. शहरभर रासायनिक रंग विक्रेते ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेत काही नागरिक आणि संस्थांकडून रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगाने धुलिवंदन साजरा करण्यावर भर दिला जात आहे. नैसर्गिक रंगामुळे कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे हे रंग चेह-यावर बराच काळ राहिले तरी त्वचेला काही नुकसान होत नाही. शिवाय कमी पाण्यात हा रंग धुवून टाकता येतो. धुलिवंदन आणि रंगपंचमीला नैसर्गिकच रंग वापरायला हवेत. रासायनिक रंग लवकर निघत नाही. त्यामुळे रासायनिक रंग लावण्यास पसंती दिली जाते. हा रंग तोंडात अथवा डोळ्यात, कानात, नाकात गेल्यास त्याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात होतात. हे रंग खेळताना काळजी घ्यायला हवी. शक्यतो हे रंग वापरू नयेत.

आज पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र धुलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रंग लावण्यासह रंगाच्या पाण्याचे प्लास्टिक पिशव्यांचे फुगे एकमेकांना मारण्याचा नवीन प्रकार सुरु झाला आहे. लांब अंतरावरून रंगाचा प्लास्टिकचा फुगा फेकून मारायचा आणि पळून जायचे, असाही रंग खेळला जात आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत या प्रकारच्या रंग खेळण्याला पसंती दिली जात आहे. लांबून फुगे फेकून मारण्यास मजा वाटत असली तरी याचे दुष्परिणाम देखील आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी या प्लास्टिक पिशव्या पडलेल्या दिसत आहेत. प्लास्टिक बंदीनंतर देखील या पिशव्या सहज उपलब्ध होत आहेत, हे नवलच !

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, “धुळवड साजरी करताना नागरिकांकडून लहान प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर केला जात आहे. प्लॅस्टिकबंदी असताना दुकानदारांकडून विक्री केली जात आहे. नागरिकांनी स्वत:हून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. रस्त्यावर प्लॅस्टिक टाकून अस्वच्छता करु नये. रंगामध्ये केमिकल मिसळले जाते. त्यामुळे रंगाचा जास्त वापर करु नये. केमिकल मिश्रीत रंगामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. खाज सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात यावा”सध्या शहरात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रंग खेळताना काळजी घ्या

# खोबरेल तेल, ऑलिव तेल किंवा जमल्यास वॅसलिन त्वचेला लावा.

# नैसर्गिक रंग वापरण्यास प्राधान्य द्या.

# पाण्याचा वापर शक्य तेवढा कमी करा.

# रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे वापरणे टाळा.

# प्रवासात असाल तर खिडक्यांच्या काचा बंद करून घ्या.

# त्वचेवरील रंग साफ करताना त्वचा घासू नका.

# त्वचेवरील सर्व रंग एकाच अंघोळीत काढण्याचा प्रयत्न करू नका.

# रंगामुळे त्वचा, कान, नाक, डोळे यांना इजा झाल्यास किंवा तसेच जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.