Pimpri : निवडणुकांपूर्वी मेट्रो सुरु करण्याचा सत्ताधा-यांचा डाव नागरिकांच्या जीवावर

विशाल वाकडकर यांचा आरोप

एमपीसी न्यूज – “राज्यातील निवडणुकीपुर्वी दापोडी ते पिंपरी मेट्रो सुरु करण्यासाठी खटाटोप करणाऱ्या भाजप सरकारचा गडबडघाई नागरिकांच्या जीवाशी बेतू शकते. काही महिन्यापुर्वी मेट्रोसाठी उभारलेल्या खांबामधील स्टील उघडेच राहिले होते. आता नव्याने नाशिक फाटा येथे शनिवारी (दि. 5) मेट्रोचे काम सुरू असताना मोठी क्रेन (ड्रील मशिन) कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र मेट्रो आणि सत्ताधारी भाजपच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे.” असा आरोप युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला आहे.

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नाशिक फाटा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, प्रदेशचे संघटक विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

विशाल वाकडकर म्हणाले की, सुदैवाने कालच्या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. सहा किलोमीटर मेट्रोचा पहिला टप्पा सुरु करण्याचा खटाटोप भाजपच्या अंगलट येवू शकतो. मेट्रो म्हणजे पीएमपीएल नव्हे. एवढया कमी अंतराची मेट्रो सुरु करुन पिंपरी-चिंचवड सत्ताधारी भाजपला नवा इतिहास लिहण्याची लगीनघाई झाली आहे. पण ही लगीनघाई बरी नाही याचा प्रत्यय व मेट्रोचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एवढी मोठी घटना घडूनही आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. यावरूनच सत्ताधाऱ्यांना शहराबद्दलचे बेगडे प्रेम दिसून येत आहे. तसेच आत्तापर्यंत झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल सिक्युरीटी ऑडिट झाल्या शिवाय या पुढे मेट्रोचे काम सुरु करुन देणार नाही.” या अपघाताला जबाबदार असणाऱ्या मेट्रो आणि सत्ताधारी भाजपाचा जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाकडकर यांनी केली.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोला राष्ट्रवादीने मंजूर मिळवली होती. मात्र आता सत्ताधारी भाजपकडून मेट्रोच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी भाजपचे मेट्रोच्या कामावर कसलेच नियंत्रण नाही. भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना या कामाचे ठेके दिले गेलेत. प्रशिक्षित कामगार न वापरता येथे काम सुरू आहे. त्यामुळेच कालच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी पुन्हा असा प्रकार घडू नये, म्हणून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.