Pimpri : सूर्य आग ओकतोय ! ; काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या तीव्र लाटेबाबतचा इशारा दिला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा उष्णतेची लाट नेहमीपेक्षा लवकर येण्याची आणि दीर्घ काळापर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जीवितास धोका उद्‌भवू नये म्हणून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे मृत्यूही होऊ शकतात. उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी जागरुक रहावे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 65 वर्षाहून अधिक वय असणा-या व्यक्ती, एक वर्षाखालील आणि एक ते पाच वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्तींना उष्मघाताचा अधिक त्रास होऊ शकतो.

उष्माघात होण्याची कारणे
उन्हात जास्तवेळ काम करणे
कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
जास्त तापमान असलेल्या बेकरी, भेळीच्या भट्ट्या, विटभट्ट्‌ीत काम करणे
घटट् कपड्यांचा वापर करणे

लक्षणे
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोट-यात वेदना येणे, गोळा येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था

‘हे’ करावे

वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे
कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत
उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे)वापरु नयेत. सैल, पांढ-या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
पाण्याचा सोबत वापर करावा. भरपूर पाणी, सरबत प्यावे
अधुनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे, सावलीत विश्रांती घ्यावी
उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे, छत्रीचा वापर करावा
घरे थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलरचा वापर करण्यात यावा. तसेच वाळ्याचे किंवा सुती ओले पडदे व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या / दारे उघड्या ठेवण्यात याव्यात.
गरोदर माता, मधुमेह, हृद्यविकार असलेल्या कामगारांची जास्त काळजी घेण्यात यावी

हे करु नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये
दारे, खिडक्या बंद करुन ठेवू नयेत.
दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात जाणे टाळावे
गडद रंगाचे, घट्‌ट्, जाड कपडे घालण्याचे टाळावे
तापमान अधिक असल्याल शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीमध्ये काम करणे टाळावे

उपचार
रुग्णास वातानुकुलीत खोलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर ठेवावेत.
रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी
रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईस पॅक लावावेत.
आवश्यकतेनुसार सलाईन देणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.