Pimpri: प्रशासनाकडून परिपत्रक मागे; ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी मंडईत नव्हे मोकळ्या पटांगणात भाजी विक्रीला परवानगी देणार

दोन दिवसात नियोजन करणार, तोपर्यंत मंडई बंदच राहणार  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडी बाजार उद्या (बुधवार) पासून सुरु करण्याबाबतचे परिपरत्रक मागे घेतले आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी मंडईत नव्हे मोकळ्या पटांगणात भाजी विक्रीला परवानगी देण्याचे नियोजन आहे. दोन दिवसांत ते नियोजन केले जाईल. तोपर्यंत मंडई बंद राहणार असल्याचा खुलासा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केला. दरम्यान, यातून प्रशासनातील समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार महापालिकेने 11 एप्रिलपासून आजपर्यंत म्हणजेच 14 एप्रिल असे चार दिवस पुर्णता बंद केले होते. त्यानंतर महापालिकेने उद्यापासून सर्व भाजी मंडई, आठवडे बाजार सुरु करण्याचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने सायंकाळी जारी केले होते. परंतु, आता ते परिपत्रक आयुक्त हर्डीकर यांनी मागे घेतले आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”भाजी मंडई, आठवडे बाजार उद्यापासू चालू करण्याबाबतचा आदेश मागे घेतला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. मंडईच्या ठिकाण भाजी खरेदी विक्री न राबविता एका मोकळ्या मैदानात भाजी खरेदी विक्री करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मंडईची ठिकाणी सुरु करण्यात आलेले आदेश तात्पुरते स्थगित केले आहेत.

मंडई ऐवजी जवळील मोकळ्या जागेत भाजी मंडई शिफ्ट केली जाणार आहे. त्याचे सुधारित आदेश काढण्यात येत आहेत. तोपर्यंत मंडई चालू होणार नाही. त्याचे नियोजन उद्या दिवसभरात केले जाईल.  ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी मोकळ्या मैदानात भाजी विक्रीला परवानगी देण्यात येणार आहे. मंडईत गर्दी होऊ नये यासाठी मोकळ्या मैदानात भाजी खरेदी विक्रीला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे आदेशात बदल केला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.