Pimpri : भूगोल फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज – पुणे येथील भूगोल फाउंडेशनच्या वतीने किल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण, वृक्षारोपण करून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. तसेच स्थानिक नागरीक, पुरातत्त्व विभाग आणि समाजसेवी संस्थाच्या सहकार्याने प्लॅस्टिक व कचरामुक्त मोहीम देखील राबविण्यात आली.

भूगोल फाउंडेशन पर्यावरण रक्षणासह ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि संवर्धन व्हावे, सामाजिक कार्यात लोकसहभाग वाढावा, या उद्देशाने मोहीम राबवित असते.  हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विसापूर किल्ला येथे जनजागृती, प्रबोधन मोहीम, प्लॅस्टिकमुक्त परिसर, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण समतोल याबाबत जनप्रबोधन केले. यासाठी विसापूर किल्ला पायथ्याशी पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली.

  • किल्ल्यावरील सर्वच पाण्याची टाकी यांची दुरावस्था झाली होती. त्यामुळे आजुबाजुला प्लॅस्टिक कचरा उचलून साफसफाई मोहीम राबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी रोहित नगीने यांनी मार्गदर्शन केले. गडाच्या पायथ्याशी आणि गडावर स्वच्छता मोहीम राबविली. गडावर महादेव मंदिराच्या समोर पिंपळ व करंज या वृक्षांचे रोपण केले. त्याचे वृक्षपालकत्व रोहित नगिने आणि निलेश निकाळजे या पुरातत्त्व खात्याच्या कर्मचारी मावळ्यांनी घेतले.

गडाच्या पायथ्याशी वड, पिंपळ, तामण,करंज, कदंब, बहावा, आंबा अशा प्रकारच्या वृक्षांचे रोपण केले. त्याचे वृक्षपालकत्व तेथील हिराबाई बाळु भोरडे, बाळु दामू भोरडे, हभप नवनाथ बाळू भोरडे, अमोल बाळू भोरडे, आप्पा बबन बैकर, पायल आप्पा बैकर, पंचक आप्पा बैकर या सर्वांनी यांनी घेतले. यावेळी सर्वांना गडसंवर्धन, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण, वृक्षसंवर्धन याविषयी भूगोल फाउंडेशनचे मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी मार्गदर्शन केले. वृक्षसंवर्धन कामासाठी तयार झालेल्या सर्वांना एकत्र गाथा देऊन त्यांचा सन्मान केला.

  • भूगोल फाउंडेशनने शिवरायांचे जन्मभूमी असलेल्या पवित्र शिवनेरी किल्ल्यापासून सुरु केलेले हे कार्य अविरत चालू आहे. आता विसापूर गडावर स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण व गड संवर्धनाचे अभियान राबविले. याकामी भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ  मार्गदर्शक विठ्ठल (नाना) वाळूंज ,निकुंज रेंगे, सुहास चव्हाण, झारखंडे राय, विठ्ठल लंघे, राजेश मोहन्तो, मुकुंद साळुंखे, राहुल शिंगोटे, मिथुन मडावी, दयानंद मगदुम व त्यांचे सहकारी असे सर्वांनी  विशेष परिश्रम घेतले.

संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे कर्नल तानाजी अरबूज, शशिकांत वाडते, विशाल गद्रे व त्यांचे इतर सहकारी, आझाद मित्र मंडळ अतुल नढे , अॅड. हर्षद नढे, अशा संस्था व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.

याबाबत भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल नाना वाळुंज यांनी सांगितले कि, गडकोटांवरील गाडलेल्या पाण्याचा टाक्यांचे संवर्धन म्हणजे पशु पक्षांच्या पाण्याचे व्यवस्थापन होय. यासाठी उन्हाळ्यामध्ये सामूहिक प्रयत्न करुन गाळ काढून ते साफ करणे गरजेचे आहे. वन्यप्राणी, पशु-पक्षी हे निसर्गसै्ांदर्य अबाधित ठेवण्याचे काम करतात. यासाठी त्यांना वाचविण्यासाठी पुढे या. त्यांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी गडकोटांवरील पाण्याचे साठे खुले करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.