Pimpri: अगोदर सायकल ट्रॅक करा, त्यानंतरच सायकल शेअरिंग सुरू करा; पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवच्या नगरसेवकांची भूमिका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरातीत तब्बल 85 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, सायकल ट्रॅक व पायाभूत सुविधा तयार करा. त्यानंतरच हा उपक्रम सुरू करण्यात यावा अशी भूमिका स्थानिक नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकला आहे.

स्मार्ट सिटीच्या विविध योजनासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी (दि.8) पालिका भवनात बैठक झाली. या वेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, सागर आंगोळकर, शशिकांत कदम, मयूर कलाटे, नगरसेविका उषा मुंढे, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, शीतल काटे, सीमा चौगुले, रेखा दर्शिले, अश्‍विनी वाघमारे , पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत स्मार्ट सिटीच्या विविध योजनेचे सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटीत एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) विभागात पब्लिक बायसिंगल शेअरींग’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यास स्थायी समितीने 1 ऑगस्टला मंजुरी दिली आहे. बीआरटीएस मार्गावरील एकूण 85 ठिकाणी त्याचे थांबे असणार आहेत. हा उपक्रम 15 ऑगस्टला सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, सायकल ट्रॅक आणि इतर पायाभूत सुविधा तयार केल्याशिवाय हा उपक्रम सुरू केला जाऊ नये, अशी आग्रही मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. त्यानुसार सायकल ट्रॅक तयार केल्यानंतरच हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पुण्यापेक्षा शहरातील सायकल भाडे अधिक नसावे, अशी मागणीही केली गेली.

नागरिकांची अडचण व वाहतूक समस्या न होता, ही योजना राबविण्याची सूचना महापौर जाधव यांनी केली. या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यासही त्यांनी सांगितले. पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव प्रमाणे समाविष्ट गावातील परिसरातही वेगवेगळ्या योजना राबविण्याबाबत सूचना महापौरांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.