Pimpri : वाहनचोरी विरोधी पथकाने हस्तगत केल्या चोरीच्या 19 दुचाकी

एमपीसी न्यूज- गस्तीदरम्यान अटक करण्यात आलेल्या एका चोरट्याकडून सुमारे पावणे सहा लाख रुपयांच्या 19 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे चोरीची वाहने विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विशाल उत्तम मेटांगळे (वय 21, रा. दावडमळा, चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्या उमाकांत अरुणसिंग साळुंखे व मनोज हरिभाऊ वाघमारे (दोघे रा.चाकण) यांनाही अटक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्‍त श्रीधर जाधव आणि राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सराईत वाहनचोर चाकण दावडमळा येथील भवानी चौकात थांबला असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार वाहनचोरी विरोधी पथकाने परिसरात सापळा रचून संशयित मेटांगळे याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ असणाऱ्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र त्यास पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने ती दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. पोलिसांनी मेटांगळे याला अटक करून तपास केला असता त्याच्याकडून पाच लाख 70 हजार रुपये किमतीच्या तब्बल 19 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

त्याच्याकडून तळेगाव, चिखली, चाकण, भोसरी, पिंपरी, खेड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 19 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच कोणतीही कागदपत्र न पाहता मेटांगळेकडून चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या साळुंखे व वाघमारे यांनाही अटक करण्यात आली.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक गिरीष चामले, कर्मचारी विवेकानंद सपकाळे, हजरत पठाण, दादा पवार, रमेश गायकवाड़, विनोद सालवी, सचिन उगले, अरूण नरळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.