Pimpri: महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच आणि अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णाचे संपूर्ण बिल माफ करण्यात येणार आहे. याबाबतचा आयत्यावेळचा प्रस्ताव बुधवारी (दि. 12)झालेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएमबरोबरच शहराच्या विविध भागांत रुग्णालये चालविली जातात. या रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर सामान्य दरात उपचार केले जातात. महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते. अशातच रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता, हे बिल आवाक्याच्या बाहेर असते.

अनेकदा या रुग्णाचा एकही नातवाईक शहरात नसल्याने हे बिल भरण्यास मित्रांना अथवा परिचितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दु:ख बाजूला ठेवून बिलाच्या रकमेची तजवीज करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून मृत व्यक्‍तीचे वैद्यकीय उपचारांचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.