Pimpri: ‘भ्रष्टाचारासाठी भाजपच्या हट्टापायी काढलेली रस्ते सफाईची 647 कोटीची निविद रद्द करा’

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेत ठेकेदाराला ‘रिंग’ करता येईल. त्यांचा फायदा होईल, अशा पद्धतीने अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. वारंवार मुदतवाढ देऊन ठेकेदारांना पोषक वातावरण केले. निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदारांचे हित जपत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. पैशांची उधळपट्टी केली जात असल्याने करदात्यांमध्ये संतापाची भावना असून केवळ सत्ताधारी भाजपच्या हट्टापायी भ्रष्टाचाराच्या हेतूने काढलेली ही निविदा तात्काळ थांबविण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या अंतर्गत रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 7 वर्ष कालावधीसाठी 647 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन नियम, अटी-शर्ती बनविण्याल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे यांनी निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

कलाटे यांनी पत्रात म्हटले आहे की, निविदा प्रक्रिया राबविताना घोळ घालण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, प्रशासन, पदाधिका-यांबाबत चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेला आहे. ही निविदा राबविल्यामुळे महापालिकेचा आर्थिक फायदा होईल असे धादांत खोटे गाजर दाखविले जात आहे. ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेऊन अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. सहा पॅकेजसाठी सहाच ठेकेदार आलटून-पालटून आहेत. त्यामुळे रिंग होण्यास मोठा वाव आहे. यातून ठेकेदारावर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होणार आहे.

याशिवाय 1100 कामगार बेरोजगार होणार आहेत. यांत्रिकीकरणामुळे आर्थिक नुकसान होणार नसल्याचे सांगत यापूर्वी घरोघरचा कचरा गोळ्या करण्यासाठी शहराचे दोन भाग केले. निविदा राबविली. परंतु, प्रत्यक्षात मनुष्यबळ कपात झाली. शेकडो कामगार बेरोजगार झाले. या निविदेत देखील महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. पुण्यात राबविण्यात आलेली रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईची पद्धत अवघ्या नऊ महिन्यात अयशस्वी ठरल्यामुळे गुंडाळावी लागली.

केवळ सत्ताधारी भाजपच्या हट्टापायी पुणे महापालिकेत अयशस्वी झालेला प्रयोग पिंपरीत राबविला जात आहे. भ्रष्टाचाराच्याच हेतून हा सर्व प्रकार राबविला जात आहे. ही निविदा राबविताना ज्या अधिका-यांनी ठेकेदारांचे हित जपले, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्या अधिका-यांवर कडक कारवाई करावी. ही निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.