Pimpri: युतीच्या पदाधिकारी बैठकीकडे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची पाठ

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना पदाधिका-यांच्या आज झालेल्या बैठकीकडे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरविली. त्यामुळे युती झाली तरी शिवसेना खासदार, संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर पुन्हा एकदा समोर आले आहे.

पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील भाजप-शिवसेना पदाधिका-यांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) आकुर्डीत बैठक झाली. शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे, महापौर राहुल जाधव, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, मावळचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर उपस्थित होते.

  • बैठकीपूर्वी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शहर भाजप कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. याठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. मात्र, बैठकीला ते आले नाहीत. यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकीय वैर उघड झाले आहे. मावळातून शिवसेनेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना निश्चित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी मावळात काम सुरु करण्याचा आदेश दिला आहे. चार दिवसांपूर्वी पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यात शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील बारणे हेच उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही, असे बारणे यांनी म्हटले आहे.

शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप बैठकीला अनुउपस्थित असल्याबाबत विचारले असता पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जगताप परवानगी घेऊन बाहरेच्या कामाकरिता गेले आहेत. दोन दिवस अगोदर त्यांनी माझी परवानगी घेतली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.