Pimpri: निगडीतील भाजप नगरसेविकेला कोरोनाचा संसर्ग

BJP corporator in Nigdi infected with corona :आजपर्यंत आठ नगरसेवकांना बाधा, एका नगरसेवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनाने पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांनाही विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील सर्वपक्षीय आठ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात निगडीतील भाजपच्या नगरसेविकेलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज (शनिवारी) स्पष्ट झाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे शनिवारी (दि.4) निधन झाले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची साखळी घट्ट झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

कोरोनाने लोकप्रतिनिधी, महापालिका कर्मचा-यांनाही विळखा घातला आहे. आजपर्यंत पालिकेतील सर्वपक्षीय आठ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

निगडीतील भाजपच्या नगरसेविका कमल घोलप यांनाही संसर्ग झाला आहे. त्यांचे रिपोर्ट शुक्रवारी (दि.10) पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना संसर्ग झालेले शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी, भाजप नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, थेरगाव भागातील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आणि पिंपळेगुरवमधील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. तर, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) निधन झाले.

महापालिका कर्मचा-यांनाही कोरोनाचा विळखा

कोरोना विरोधात लढणा-या महापालिका कर्मचा-यांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना योद्धा डॉक्टर, नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. भोसरी, आकुर्डी रुग्णालयातील वॉर्डबॉय, आया, मावशी यांनाही बाधा झाली आहे.

पालिका मुख्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, कर संकलन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील साफसपाई कर्मचा-यांनाही बाधा झाली आहे. कोरोना विरोधात लढणा-या कर्मचा-यांना लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आजपर्यंत 30 हून अधिक पालिका कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like