Pimpri: महापौरांकडून भाजप नगरसेवकांचीच गळचेपी; स्वपक्षिय नगरसेविकेचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांच्या अधिकारांवर महापौर राहुल जाधव गदा आणत आहेत. महासभेत लेखी प्रश्न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार असताना महापौरांकडून लेखी प्रश्न स्वीकारले जात नाहीत, असा आरोप भाजप नगरसेविका माया बारणे यांनी केला. तसेच अधिका-यांना वाचविण्यासाठी महापौर विरोधकच नव्हे तर, स्वपक्षिय नगरसेवकांचीच गळचेपी करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

महापालिकेत माया बारणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषेद घेत महापौर, प्रशासनावार हल्लाबोल केला. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून माया बारणे यांना ओळखले जाते. तर, आमदार महेश लांडगे यांचे महापौर राहुल जाधव समर्थक आहेत. आमदारांच्या दोन्ही समर्थकांमध्ये जुंपल्याने याची महापालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.

  • यावेळी माया बारणे म्हणाल्या, झोपडपट्टी पुनर्वसन, पंतप्रधान आवास योजना, सल्लागारांबाबत, निविदा न मागविता थेट पद्धतीने दिलेल्या कामांबाबत लेखी प्रश्न महापौरांकडे घेण्याची मागणी केली होती. तथापि, महापौर राहुल जाधव यांनी प्रश्न स्वीकारले नाहीत. महापौर म्हणतात, महासभेत प्रश्नांवर थेट चर्चा केली जाईल. परंतु, प्रश्न स्वीकारले जाणार नाहीत. महासभेत लेखी प्रश्न विचारायचा नगरसेवकांना अधिकार आहे. तोंडी चर्चेला उत्तर देण्यास अधिकारी बांदील नसतात. लेखी प्रश्न विचारल्यास अधिका-यांना लेखी उत्तरे देणे बंधनकारक असते. त्यामुळे शहरातील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होते. त्यातून शहरातील प्रश्नांचे वास्तव समोर येते.

महापौरांना प्रश्न स्वीकारण्यासाठी कशाची भिती वाटते? असा सवाल उपस्थित करत बारणे म्हणाल्या, महापौर जाधव कुठेतरी अधिका-यांना वाचवत आहेत. प्रश्नांची लेखी उत्तरे देता येऊ नयेत, यासाठीच महापौर प्रश्न घेत नाहीत. पक्षाच्या पार्टी मिटिंगमध्ये देखील बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रश्न स्वीकारल्यास विरोधक देखील त्यावर सकारात्मक चर्चा करतील. चांगल्या गोष्टीला ते देखील विरोध करणार नाहीत. तेही शहराचे नागरिक आहेत. महापौर प्रश्न स्वीकारत नाहीत अन्‌ आयुक्त उत्तरे देत नाहीत. अधिकारी उडवाउडवीची माहिती देत असल्याची हतबलताही त्यांनी बोलून दाखविली. आयुक्त श्रावण हर्डीकर निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”आत्तापर्यंत कोणाचेही प्रश्न घेतले नाहीत. आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता उठल्यानंतर प्रश्न स्वीकारण्याबाबत विचार केला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.