_MPC_DIR_MPU_III

Pimpri: भाजप नगरसेवकांना झालयं तरी काय?, दीड वर्षात पाच नगरसेवकांवर गंभीर गुन्हे !

नगरसेवकांची गुन्हेगारी भाजपात चिंतेचा विषय

(गणेश यादव)

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी ‘भयमुक्त’ शहराचा नारा देत सत्ता काबीज केलेल्या भाजप नगरसेवकांपासूनच आता ‘अभय’ मागण्याची वेळ मतदारांवर आली आहे. कारण, गेल्या दीड वर्षात भाजपच्या तब्बल पाच नगरसेवकांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, तीन नगरसेविकेच्या पतीवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर भाजप झोपडपट्टी आघाडीच्या शहराध्यक्षावर आणि एका माजी स्वीकृत सदस्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. वाढती गुन्हेगारी भाजपात चिंतेचा विषय झाला असून नगरसेवकांना सत्तेची धुंदी चढली का? अशी चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी ‘भयमुक्त शहर आणि पारदर्शक’ कारभाराचा नारा दिला होता. यावर विश्वास ठेवून शहरातील जनतेने भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपविली. तथापि, सत्तेच्या दीड वर्षाच्या राजवटीत ‘पारदर्शक’ शब्दाचे हसे झाले आहे. तर, भाजप नगरसेवकांपासूनच भयमुक्त ठेवण्याची मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कारण, गेल्या दीड वर्षात भाजपच्या पाच नगरसेवकांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, आत्यहत्येस प्रवृत्त करणे, मारहाण, महापालिका कर्मचा-याला मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

मोरवाडी प्रभागाचे भाजपा नगरसेवक तुषार हिंगे यांच्यावर 30 सप्टेंबर 2017 रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. जुने भांडण आणि आर्थिक देवाण-घेवाणीतून दोघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजपचे पिंपळे निलखचे नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर 27 ऑक्टोबर 2017 रोजी खोटी माहिती दिल्याप्रकरणी सांगवी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखला झाला होता. तसेच कामठे यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार देखील एका जाहिरात एजन्सीने केली होती.

_MPC_DIR_MPU_II

टपरीधारकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संत तुकारामनगर प्रभागाच्या भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर 28 मे 2018 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात त्यांच्या पतीवर देखील गुन्हा दाखल झाला होता. क्रीडा समितीचे सभापती व पूर्णानगर, कृष्णानगर प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांच्यावर पाणीपुरीवाल्याला मारहाण आणि तोडफोड केल्याचा गुन्हा 4 जून 2018 रोजी निगडी ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर गुरुवारी (दि.25 ऑक्टोबर) महापालिकेच्या औषध फवारणी कर्मचा-याला मारहाण केल्याप्रकरणी निगडीचे भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर, निगडीच्याच नगरसेविका कमल घोलप यांचे पती बापू घोलप यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच शिवीगाळ करून पोलीस कर्मचा-यांना धक्काबुक्की केली होती. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर निगडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सार्वजनिक शौचालयाची मागणी केली म्हणून दिव्यांग व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी भोसरीतील एका नगरसेविकेच्या पतीविरोधात भोसरी ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. तसेच जातपंचायतीबाबत पिंपळेगुरव परिसरातील नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय भाजप झोपडपट्टी आघाडीचे शहराध्यक्ष मनोज पवार यांच्यावर 14 फेब्रुवारी 2018 रोजी व्यावसायिकाची फसवणूक आणि त्याला मारहाण केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तसेच खराळवाडीतील माजी नगरसेवकांची सुपारी दिल्याप्रकरणी स्वीकृत सदस्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

भाजपच्या नगरसेवकांवरील हे गुन्हे पाहिल्यानंतर भयमुक्त शहर आहे कुठे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भाजप नगरसेवकांपासूनच ‘अभय’ मिळावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत. तर, पक्षातील नगरसेवकांची वाढती गुन्हेगारी हा पक्षासाठी चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आपल्या नगरसेवकांना वेळीच आवार घालावा लागेल. अन्यथा ‘भयमुक्त’ शहराचा ना-याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.