Pimpri: अर्धवट कामांची फलकबाजी करुन भाजपकडून शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक! -मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न अर्धवट अवस्थेत असताना भाजपकडून प्रश्न मार्गी लावल्याची खोटी जाहिरातबाजी केली जात आहे. जाहिरातबाजी म्हणजे दिवसाढवळ्या शहरवासियांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. तसेच भाजपच्या जाहिरातबाजी, धोकेबाजीला शहरातील जागृत जनता भुलणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धील दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, मागील पाच वर्षात शहरातील एकही अनधिकृत बांधकाम नियिमत झाले नाही. झाले असेल तर सत्ताधा-यांनी जाहीर सभा घेऊन त्याची यादी द्यावी. विरोधात असताना भाजपने सरसकट शास्तीकर माफीची मागणी केली होती. शास्तीकर सरकट माफ झाला नाही. पोलीस आयुक्तालय झाल्यापासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. अवैध व्यवसाय व गुन्हे वाढले आहेत.

प्राधिकरण क्षेत्रातील बाधीत शेतक-यांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या साडे बारा टक्यांऐवजी संपादित क्षेत्राच्या 6.2 टक्के परतावा देण्यास सरकारने मान्यता दिली. त्यानुसार प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये डीसी रुल्समध्ये आवश्यक ती सुधारणा करुन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. हे प्रश्न प्रलंबित असताना मार्गी लावल्याची खोटी जाहिरात भाजपने केल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे स्मार्ट सिटी ऐवजी बकाल सिटी झाली आहे. फायबर ऑप्टिक केबलचे साडे सातशे किमीचे जाळे उभारण्यात थेट लोकप्रतिनिधींनीच भागीदा-या केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले आणि खर्च किती झाला याचा ताळमेळ ब्रम्हदेवाला देखील बसू शकत नाही, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.