Pimpri: भाजप स्थायी समितीतील चार नगरसेवकांचे राजीनामे घेणार?

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश

एमपीसी न्यूज – स्थायी समितीत जास्तीत-जास्त सदस्यांना संधी देण्यासाठी पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप यावर्षी पुन्हा एक वर्षाचे धोरण अवलंबिणार आहे. स्थायी समितीत एक वर्ष पुर्ण झालेल्या चार सदस्यांचे राजीनामे घेवून नवीन चार सदस्यांना संधी द्यावी असा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झालेल्या आरती चोंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान,  एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर संतोष लोंढे यांना दुस-या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे लोंढे आणि मागील वर्षी अध्यक्षपद मिळालेले विलास मडिगेरी ‘नशीबवान’ ठरले आहेत. आता पुढीलवर्षी शिंदे यांना अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला असल्याचे बोलले जात आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत एकहाती सत्ता आलेल्या भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण केले. त्यानुसार पहिल्यावर्षी ‘ड्रॉ’मधून वाचलेल्या सदस्यांसह स्थायीच्या सर्व 10 आणि अपक्ष एक असे 11 सदस्यांचे राजीनामे घेतले. तथापि, दुस-यावर्षी त्या धोरणात बदल केला. गतवर्षी सदस्यांचे राजीनामे घेतले नव्हते. त्यामुळे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा ममता गायकवाड, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे या सहा जणांना दोन वर्षांचा कालावधी मिळाला असून ते नशीबवान ठरले आहेत.

यंदा पुन्हा जास्तीत-जास्त नगरसेवकांना संधी देण्याचे कारण देत एक वर्षाचे धोरण अवलंबिण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.  एक वर्ष पूर्ण झालेल्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्याजागी नवीन चार सदस्यांना संधी द्यावी असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. परंतु, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुस-या वर्षी  संतोष लोंढे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.6) होणार आहे. त्यानंतर स्थायी सदस्यत्वाचा आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या आरती चोंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, शीतल शिंदे यांना पुढील वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द पक्षाने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांना आता समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. आता समितीतून बाहेर न पडल्यास शिंदे यांचा स्थायीत तीन वर्षाचा कार्यकाळ होईल. त्यामुळे आता बाहेर पडून पुढील वर्षी स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवून अध्यक्षपदाचे दावेदार होण्यासाठी शिंदे देखील राजीनामा देण्यास तयार होतील, असे सूत्रांनी सांगितले.

याबाबत सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”स्थायी समितीतील सदस्यांना एक वर्ष संधी देण्याबाबतच्या धोरणाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.