Pimpri: ‘भाजपचे दुटप्पी धोरण अन्‌ नाकर्तेपणामुळे बंद पाईपलाईन योजना गुंडाळण्याची भीती’

सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे पिंपरी-चिंचवडकर शुद्ध पाण्यापासून राहणार वंचित

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प व मावळातील शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपने बोटचेपी भूमिका घेतली आहे. सर्वत्र भाजपची सत्ता असल्याने बंद पाईपलाईन प्रकल्प पूर्ण होऊन शुध्द पाणी मिळेल अशी शहरवासियांना अपेक्षा होती. असे असतानाच ठेकेदारांनी काम न करण्याचे पत्र महापालिकेस दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बंद पाईपलाईन योजना सत्ताधारी भाजपाच्या दुटप्पी धोरण आणि नाकर्तेपणामुळे गुंडाळली जाण्याची भीती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केली आहे.

पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी बंद पाईपलाईन योजना आणि भामा आसखेडहून शहरासाठी होणारी पाईपलाईन योजना मार्गी लागण्याची गरज असून या दोन्ही योजना तात्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना बंद पाईपद्वारे शुध्द आणि मुबलक पाणी मिळावे या हेतूने तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना बंद पाईपलाईन योजनेच्या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती तर महापालिकेने या प्रकल्पाला मंजुरीही दिली होती.

2008 साली हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता; मात्र मावळमधील भाजप व शिवसेना नेत्यांनी त्याचे राजकारण करुन या योजनेला विरोध केला. मागील अडीच वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, शहराच्या विकासासाठी योजना पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले आहे. पवना धरणातून रावेत बंधा-यापर्यंत पाणी येताना नदीपात्रात परिसरातील कंपन्यांचे प्रदूषित पाणी, मैलामिश्रीत पाणी थेटपणे नदीत सोडल्याने रावेत बंधा-यातील पाणी अशुध्द होऊन तेच पाणी शहरातील नागरिकांना प्यावे लागत आहे.

शहरवासियांची पाण्याची गरज लक्षात घेऊन आणि मावळमधील शेतक-यांना विश्‍वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी साने यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like