Pimpri: भाजपकडून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल – योगेश बाबर

Pimpri: BJP misleads the people of Maharashtra - Yogesh Babar

एमपीसी न्यूज –  कोरोना महामारी रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारला आलेले यश भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खूपत आहे.  सरकार 11 कोटी जनतेला सोबत घेऊन कोरोना महामारीशी यशस्वीपणे दोन हात करीत असताना, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून मात्र कोरोनाचे राजकारण केले जात आहे. भाजपकडून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात बाबर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारला यश आले आहे. नेमके हेच भाजप नेत्यांना खूपत आहे. महाराष्ट्राचा कोरोना वाढीचा दर 1.32 असून देशाच्या 1.61  या सरासरी वाढीच्या दरापेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्रात कोरोना पासून बरे झालेल्या पेशंटची संख्या सर्वाधिक असून देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. जर देशात कोरोनाला अटकाव करण्यात केंद्र शासनाला यश आले असेल. तर, मुंबई आणि महाआघाडी सरकारचे त्या यशात योगदान नाही का, असा सवालही त्यांनी केला.

राज्य आर्थिक संकटात असताना भाजप आमदार, नगरसेवकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मानधन देण्याऐवजी पीएम केअर्स फंडाला दिले. शिवरायांच्या जन्मभूमीतील महाराष्ट्राचे विधिमंडळ सदस्य म्हणून आपली भूमिका जाहीर करावी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दोन्ही शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. याला सत्ताधारी भाजपला जवाबदार धरायचे का, असा प्रश्न बाबर यांनी उपस्थित केला आहे.

सरकार उद्योगधंदे, व्यापार सुरु करून महाराष्ट्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची आकडेवारी देशात कशी सर्वाधिक आहे. सामान्य जनतेला सरकारने कसे वा-यावर सोडून दिले आहे. केरळ सारख्या राज्यांनी कोरोनाचा कशाप्रकारे अटकाव केला आहे, अशा गैरलागू तुलना आणि टीका करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा डाव महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी काळ्या आंदोलनातून केला, असा आरोपही बाबर यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.