Pimpri: मर्जीतील कंत्राटदाराला ठेका मिळत नसल्यामुळे भाजप आमदारांचा तिळपापड – मयूर कलाटे

सुरक्षा रक्षक नेमणूक निविदेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

एमपीसी न्यूज – पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्रे पाठवून माहिती मागविण्याचा सपाटा चालविला आहे.  त्यावरुन राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून मागील तीन वर्षापासून हे आमदार झोपले होते का? आताचं असं काय अघटीत घडले आणि आयुक्त अकार्यक्षम असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला आहे. भाजपच्या आमदारांना खरोखरच जनतेचा कळवळा आहे की मर्जीतील कंत्राटदारांना ठेका मिळत नसल्याने त्यांचा  तिळपापड झालाय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे की, भाजप आमदारांना मागील तीन वर्षात शिष्टाचारी वाटणारे आयुक्त आता भ्रष्टाचारी कसे वाटू लागले? राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेचे नगरसेवक आयुक्तांवर टीका करत असताना भाजप त्यांची बाजू घेत होता. मागील तीन वर्षात आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर सत्ताधारी भाजप आमदार व नगरसेवक खूष होते. मग आताच असे काय झाले की आयुक्त अकार्यक्षम झाले?

भाजपच्या आमदारांना खरोखरच जनतेचा कळवळा आहे की मर्जीतील ठेकेदारांना निविदा मिळत नसल्यामुळे तिळपापड झालाय? की  टीडीआर होत नाहीत याचा राग आला आहे. नक्की यांचा रोष जनतेसाठी आहे की स्वत:साठी आहे, हे सुजाण नागरिकांनी ओळखावे, असे कलाटे यांनी म्हटले आहे.

आता कोरोना काळात आयुक्तांवर गंभीर आरोप करुन प्रशासनाच्या कामावर गैरविश्वास दाखवत भाजप आमदारांनी आयुक्त व प्रशासनाच्या विरोधात मोहीम उघडण्याचा इशारा दिला आहे. हे म्हणजे स्वत:च मागील तीन वर्षात सत्ताधारी भाजपचे प्रशासनावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. त्यामुळे शहराच्या विकासकामांचा खेळखंडोबा केल्याची सत्ताधाऱ्यांनी स्वतः कबुलीच दिली आहे, असे कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.