BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: ‘वायसीएमएच’ची दुखरी नस सत्ताधा-यांना सापडेना; मात्र खरेदीत रस 

स्थानिक अधिका-यांची 'वायसीएमएच'मधून काढली 'विकेट'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांना अडीच वर्षानंतर देखील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच)ची दुखरी नस सापडत नाही. औषधांच्या खरेदीत मात्र सत्ताधा-यांना प्रचंड रस दिसून येत आहे. औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. स्थानिक अधिका-यांची वायसीएममधून ‘विकेट’ काढली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या ताब्यात ‘वायसीएमएचा’ कारभार दिला आहे. त्यामुळे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. रुग्णालयाचा दर्जा आणखीनच खालावत चालला असून जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशी परिस्थिती वायसीएमएच रुग्णालयाची झाली आहे.

महापालिकेत कारभारी होताच भाजप पदाधिका-यांनी आपल्याला अनुकूल नसलेल्या अधिकारी, डॉक्टरांना सोईस्करित्या ‘वायसीएमएच’मधून बाहेर काढले. आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे महत्वाच्या जबाबदा-या दिल्या. आयुक्तांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन वायसीएमएचचा कारभार प्रतिनियुक्तीवरील अधिका-याच्या ताब्यात दिला. आता त्यावर कडी करत स्थानिक असलेले वायसीएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख आणि वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांना तेथून हटविले आहे. देशमुख यांच्या डोक्यावर निर्माणाधीन जिजामाता तर डॉ. जाधव यांच्यावर भोसरी रुग्णालयाचा भार दिला आहे. विशेष म्हणजे भोसरी रुग्णालयाचा खासगीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच महासभेत मंजूर केला आहे.

सत्ताधा-यांना केवळ वायसीएमएच्या खरेदीत रस दिसून येतो. वायसीएमचची दुरवस्था असल्याचा भास निर्माण केला जातो. औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. मग, पदाधिकारी बैठका घेतात. त्यानंतर सतरा कोटींचा औषधे खरेदी करण्याचा प्रस्ताव येतो. त्यानंतर विरोधी पक्षातील नगरसेवक रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत पत्रक काढतात. लगेच दुस-या दिवशी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी ‘वायसीएमएचा’ पाहणी दौरा करतात. हा केवळ ‘योगायोग’ समजायचा की सत्ताधा-यांनी सांगायचे अन्‌ विरोधकांनी पत्रक काढायचे आणि मग पुन्हा सत्ताधा-यांनी पाहणी करायची असा तर प्रकार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यानंतर संध्याकाळी स्थानिक अधिका-यांना वायसीएमएचमधून हटविण्याचा आदेश निघतो. त्यामुळे यातून संशयाचे धुके निर्माण होत आहे.

पदव्युत्तर संस्थेचा केवळ बागलबुवा केला जात आहे. तब्बल दोन वर्षानंतरही पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तितकीशी चालना मिळाली नाही. प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या ताब्यात वायसीएमएचा कारभार दिला आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना पदाधिकारी, नगरसेवकांची माहिती नाही. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, डॉक्टरांचा वायसीएमएच रुग्णालय सोडून महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दालनातच ‘फाईल’ घेऊन जास्त वावर दिसून येतो. त्यांचे कामाकडे लक्ष नाही. केवळ पदाधिका-यांना खूश करण्यातच त्यांचा वेळ जात आहे. एकंदरीतच वायसीएमएचचा कारभार म्हणजे जखम मांडीला अन्‌ मलम शेंडीला असा प्रकार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like