Pimpri: वाकडच्या रस्ते विकासावरून भाजप दुभंगली; आमदार लक्ष्मण जगताप यांना धोबीपछाड; महेश लांडगे गटाची राहुल कलाटेंना साथ

रस्त्याचा विषय पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर : split over Wakad road development; ; Mahesh Landage's group with Rahul Kalaten

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये बेबनाव झाला असून त्याचा फटका आज (बुधवारी) स्थायी समितीत भाजपला बसला. वाकड येथील रस्ते विकासाचे 40 कोटी रुपयांची कामे करण्यास जगताप समर्थक नगरसेवकांनी विरोध केला. तर,  शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या बाजूने लांडगे समर्थक नगरसेवकांनी पाठबळ उभे केले. त्यामुळे रस्ते विकासाचा प्रस्ताव आठ विरुद्ध पाच मतांनी मंजूर झाला.

विषय मंजूर होताच जगताप समर्थकांनी सभात्याग केला. कलाटे यांनी विषय मंजूर करून घेत आमदार जगताप यांना हा मोठा धक्का दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली.  संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

स्थायी समितीच्या मागील दोन सभा तहकूब झाल्याने त्यांचे कामकाज आज पार पडले. 29 जुलैच्या विषयपत्रिकेवर वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 25 मधील रस्ते विकास कामाचे सुमारे 75 कोटी रुपये तर शाळा इमारत बांधण्याचा सुमारे 24 कोटी रुपयांचा असे एकत्रित 100 कोटीचे विषय पत्रिकेवर होते.

आयुक्तांनी मांडलेल्या या चारही प्रस्तावांना भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी विरोध केला होता. या चारही निविदांची प्रक्रिया, आर्थिक तरतूद, ठेकेदारांची स्पर्धा याची संपूर्ण माहिती मिळावी.

तसेच अभ्यासासाठी हे चारही विषय 15 दिवस तहकूब ठेवावेत अशा मागणीचे लेखी पत्र स्थायी समितीतील जगताप समर्थक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, झामाबाई बारणे, आरती चोंधे या सदस्यांनी 29 जुलै रोजी अध्यक्ष लोंढे यांना दिले होते.

आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात विधानसभा निवडणुकीपासून द्वंद्व सुरू आहे.  त्याचे प्रतिबिंब स्थायी समिती सभा कामकाजात उमटत आहे.

वाकड प्रभागाचे प्रतिनिधित्व राहुल कलाटे करत असल्याने ‘आडवा आणि जिरवा’ धोरण जगताप समर्थकांनी  अवलंबविल्याचा आरोप होत आहे. आजच्या सभेतही जगताप समर्थक नगरसेवकांनी वाकडच्या विषयाला विरोध केला.

वाकडचे चारही विषय फेटाळून लावा असा आग्रह स्थायी समिती अध्यक्षांकडे धरला. तर, रस्ते विकास, शाळा इमारत उभारणे याची गरज राहुल कलाटे यांनी विषद केली. त्यावर या कामांची गरजच नाही. फेटाळून लावा. शाळेचा एकमेव मंजूर करा, असे जगताप समर्थक म्हणाले.

तर, ‘तुम्ही कोण ठरवणार गरज नाही’, असे कलाटे यांनी सुनावले. अध्यक्षांनी मध्यस्थी करत दोन विषय  तहकूब ठेवतो दोन मंजूर करतो अशी भूमिका घेतली. पण, जगताप समर्थक विषय फेटाळून लावण्याच्या मागणीवर ठाम राहिले. जगताप समर्थक ऐकत नसल्याने शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेत मतदानाची मागणी केली.

त्या मागणीनुसार ताथवडे येथील शनिमंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणा-या  30 मीटर रूंद रस्ताच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. या मतदानावरून भाजप नगरसेवकांमध्ये उभी फूट पडली.

आमदार जगताप समर्थक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, आरती चोंधे या पाच सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.

तर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या बाजूने भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे गटाचे राजेंद्र लांडगे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, विजय उर्फ शीतल शिंदे, राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा धर यांनी मतदान केले.

त्यामुळे प्रस्ताव पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाल्याचे समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी जाहीर केले. प्रस्ताव मंजूर होताच जगताप समर्थक पाचही नगरसेवकांनी सभात्याग केला.

तर, वाकड येथील शाळा इमारत बंधने (19 कोटी 99 लाख रुपये) विषयही मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.