Pimpri : भाजप शिवसेनेसोबत होती,आहे आणि राहणार-श्वेता शालिनी

गरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा मोदी सरकाराचा ऐतिहासिक निर्णय 

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेनेचे विचार वेगळे असतील मात्र अजेंडा एकच असून तो हिंदुत्वचा आहे. त्यामुळे आम्ही सोबत असून शिवसेना सरकारमध्ये आमच्याबरोबर आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेसोबत होती, आहे आणि आगामी काळात देखील राहणार आहे, असे भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच ‘सबका साथ सबका विकास’ या ना-यानुसार मोदी सरकारने गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.

मोरवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,  सभागृह नेते एकनाथ पवार, माजी महापौर आर. एस. कुमार,  सरचिटणीस अमोल थोरात उपस्थित होते.

गरीब सवर्णांना आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. परंतु, आतापर्यंत कोणत्याही सरकारला हे आरक्षण देता आले नाही असे सांगत शालिनी म्हणाल्या, भाजपने  ‘सबका साथ सबका विकास’ हा निरा दिला होता. त्यानुसार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पुर्वसंध्येला गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  घटनेतील कलम 15 आणि 16  मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणाबाबत वेगवेगळे उपकलम नमूद आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना सवर्णांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे विरोधकांनी देखील स्वागत केले आहे. त्यामुळे याबाबतचे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत लवकरच मंजूर होईल.  याबाबतच्या विधयेकाला सर्व विरोधक साथ देतील आणि गरीब सवर्णांना आरक्षणाचा कायदा तयार होईल, असा विश्वासही  शालिनी यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.