Pimpri: भाजप नगरसेवकाच्याच कार्यक्रमात पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्षांवर टीकास्त्र ; पक्षाकडून कारवाईचे संकेत

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेतील भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आयोजित केलेल्या भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच भाजप नगरसेवकाच्याच कार्यक्रमात भाजप विरोधातच एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यामुळे भाजपधील पक्षशिस्त संपली की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मागविली असून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्या पुढाकाराने पिंपरीत भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांना आमंत्रित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

‌मेवानी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तसेच भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

‌भाजप शिस्तीचा पक्ष मानला जातो. पक्षाला महत्व दिले जाते. परंतु, भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या नगरसेवकाच्या कार्यक्रमातच पक्षाच्या हायकमांडवर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे भाजपमधील पक्षशिस्त संपली की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, “या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मागविली आहे. भाषणाचा ‘व्हिडीओ’ मागितला आहे. कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.