Pimpri: भाजपचे अमित गोरखे करणार बंडखोरी; अपक्ष म्हणून उद्या भरणार अर्ज

एमपीसी न्यूज – अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे बंडखोरी करणार आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून गोरखे उद्या (गुरुवारी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून गोरखे तीव्र इच्छुक होते. त्यानुसार त्यांनी मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात तयारी देखील केली होती. मतदारसंघाची बांधणी केली होती. कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. परंतु, शिवसेना-भाजप-आरपीआय(रिपाइं)ची महायुती झाली. त्यामध्ये महायुतीने शहरातील तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यानुसार पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे नाराज झाले आहेत. त्यामुळे गोरखे यांनी बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार गोरखे उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आकुर्डीतील खंडोबामाळापासून रॅली काढून आकुर्डीतील हेडगेवार भवन येथे गोरखे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती गोरखे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.